अलिबाग, दि.1: करोना विषाणू प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे परराज्यातील अडकून पडलेल्या नागरिकांसाठी आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याकरिता जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत अधिकारी म्हणून घोषित केले आहे.
रायगड जिल्हयातून परराज्यामध्ये जावू इच्छिणाऱ्या कामगार / पर्यटक / भाविक / विद्यार्थी व इतर व्यक्तींनी त्यांच्या राज्यामध्ये किंवा त्यांच्या मूळ निवासाच्या इच्छित स्थळी जाण्याकरिता निश्चित कार्यपध्दती अवलंबविण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
यामध्ये सध्या विविध कॅम्पमध्ये जे मजूर आहेत त्यांच्याबाबतीत ते ज्या राज्यातील निवासी आहेत अशा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना मजूरांच्या यादीसह संपर्क साधून त्यांची सहमती घेण्यात येणार आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून सहमती मिळल्यानंतर या मजूरांना वाहनाद्वारे त्यांच्या मूळ निवासाच्या ठिकाणी पाससह पाठविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
इतर राज्यातील ज्या व्यक्ती रायगड जिल्ह्यात अडकून पडल्या असतील व ते त्यांच्या मूळ गावी वास्तव्याच्या जिल्ह्यात जावू इच्छित असतील, अशा व्यक्तींनी प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या नावासह तसेच वाहनाचा प्रकार व क्रमांक या बाबी नमूद करुन रायगड जिल्ह्यातील Raigad e-Pass या ॲपवर अर्ज करावा.
त्याचप्रमाणे रायगड जिल्हयातून बाहेर राज्यामध्ये जाणाऱ्या कामगार / पर्यटक / भाविक / विद्यार्थी व इतर व्यक्तींनी https://forms.gle/fgEGNoGTxber4HRs5 या लिंकवर माहितीही भरावी.
रायगड जिल्हयातून बाहेर राज्यामध्ये जाणाऱ्या कामगार / पर्यटक / भाविक / विद्यार्थी व इतर व्यक्तींनी वाहतूक/प्रवास करण्यासाठी वरील गुगल लिंक मध्ये माहिती भरल्यानंतर तसेच Raigad e-Pass या ॲपद्वारे अर्ज केल्यानंतर परराज्यात जावू इच्छिणाऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडून रविवार, दि.3 मे, 2020 पासून परवानगी देण्यास सुरुवात केली जाणार आहे.
प्रवास करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीने ते सध्या जेथे राहत आहेत तेथील नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र / ग्रामीण रुग्णालय / उप जिल्हा रुग्णालय / जिल्हा रुग्णालय किंवा नोंदणीकृत खाजगी दवाखाना येथे संपर्क साधून संबंधित डॉक्टरकडून स्वत:ची तपासणी करुन घेवून वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध करुन घेणे बंधनकारक राहील व ते वैद्यकीय प्रमाणपत्र प्रवासादरम्यान स्वत: सोबत बाळगणे तसेच स्वत:स 14 दिवस गृह विलगीकरण (Home Quarantine) करुन घेणे बंधनकारक असणार आहे.
तरी रायगड जिल्ह्यामध्ये परराज्यातील जे मजूर अथवा व्यक्ती अडकल्या आहेत, अशा व्यक्तींनी त्यांच्या राज्यामध्ये किंवा त्यांच्या मूळ निवासाच्या इच्छित स्थळी जाण्याकरिता जिल्हा प्रशासनाने सूचना दिल्याप्रमाणे कार्यवाही करावी व जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!