डिजिटल दिवाळी अंकालाही पाठबळ देण्याची लोकनेते रामशेठ ठाकूर यांची घोषणा
घरात शोकेस नसला तरी चालेल पण बुककेस हवा- सुप्रसिद्ध कवयित्री व लेखिका नीरजा
सर्वांच्या सहभागातून स्पर्धा मोठी झाली- आमदार प्रशांत ठाकूर
देशातील सर्वात मोठी दिवाळी अंक स्पर्धा- संदीप चव्हाण
पनवेल दि.२१ (हरेश साठे) सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या २३ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत अशोक कोठावळे संपादित ‘दीपावली’ तर रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत विजय जाधव संपादित ‘सृजन’ या दिवाळी अंकाने प्रथम क्रमांकाचा सन्मान पटकाविला. राज्यस्तरीय विजेत्या ‘दीपावली’ या अंकाला ०१ लाख रुपये व सन्मानचिन्ह, तर रायगड जिल्हास्तरीय विजेत्या ‘सृजन’ या अंकाला ४० हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन लोकनेते रामशेठ ठाकूर, ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे, सुप्रसिद्ध कवयित्री व लेखिका नीरजा यांच्या हस्ते समारंभपुर्वक गौरविण्यात आले.
मराठी साहित्य विश्वाला उंची देण्याचे काम दिवाळी अंकांनी केले आहे, असे प्रतिपादन ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले. तर येत्या दिवाळी अंक स्पर्धेपासून डिजिटल दिवाळी अंकांना पुरस्कार देण्याची घोषणा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केली.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे संस्थापक माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकासमोरील मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्यास स्पर्धेचे आयोजक श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, मंडळाचे सचिव परेश ठाकूर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, स्पर्धा समन्वयक दीपक म्हात्रे, माध्यम सल्लागार जयु भाटकर, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्सचे जनरल सेक्रेटरी वाय. टी. देशमुख, ज्येष्ठ पत्रकार निला उपाध्ये, मुंबई मराठी पत्रकार संघाचे विश्वस्त देवदास मटाले, माजी अध्यक्ष नरेंद्र वाबळे, परीक्षक अविनाश कोल्हे यांच्यासह विविध दिवाळी अंकांचे संपादक, लेखक, साहित्यिक, कवी, व्यंगचित्रकार, पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते.
दिवाळी अंक ही महाराष्ट्राची पूर्वापार चालत आलेली एक सांस्कॄतिक परंपरा आहे. ही परंपरा अखंडपणे चालू राहावी व त्यातून दर्जेदार दिवाळी अंकांची निमिर्ती व्हावी, यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्यावतीने महाराष्ट्रातील सर्वात मोठया दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते आणि या स्पर्धेला राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. त्यामुळे दिवाळी अंकांच्या ११३ वर्षांच्या परंपरेत खंड पडला नाही. त्या अनुषंगाने सन २०२३ अर्थात २३ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत गिरगाव येथील अशोक कोठावळे यांच्या ‘दीपावली’ अंकाने प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक गोरेगावच्या अरुण शेवते यांच्या ‘ऋतुरंग’, तृतीय क्रमांक ठाणे येथील शुभदा चौकर यांच्या ‘वयम’, पुणेचे मोतीराम पौळ यांच्या ‘अक्षरदान’ने उत्कृष्ट विशेषांक, अभिराम अंतरकर यांच्या ‘हंस’ अंकाने उत्कृष्ट दिवाळी अंक, उत्कृष्ठ कविता कवियित्री संगीता बर्वे (मौज दिवाळी अंक), उत्कृष्ठ कथा ‘इनसायडर’ (लेखक पंकज करुळकर- युगांतर दिवाळी अंक), उत्कृष्ठ व्यंगचित्र धमाल धमाका दिवाळी अंक (घनश्याम देशमुख), उत्कृष्ठ मुखपृष्ठ चंद्रकांत दिवाळी अंक (किरण हणमशेठ), उत्कृष्ठ लेख अनिल पाटील (चंद्रकांत दिवाळी अंक), लक्षवेधी परिसंवाद ‘एआय चे जग’ (अक्षर दिवाळी अंक), लक्षवेधी मुलाखत डॉ. राजुरकर (लय भारी दिवाळी अंक) यांनी पटकाविला. रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत विजय जाधव यांच्या ‘सृजन’ अंकाने प्रथम क्रमांकाचा मान मिळविला. द्वितीय क्रमांक विनोद साळवी यांच्या ‘शब्द संवाद’, तृतीय क्रमांक शारदा धुळप यांच्या ‘साहित्य आभा’ तर उत्तेजनार्थ प्रमोद वालेकर यांच्या ‘दैनिक किल्ले रायगड’ आणि दीपक म्हात्रे यांच्या ‘आगरी दर्पण’ अंकाने पटकाविले. उत्कृष्ट कथा आसक्या (साहित्यविश्व, राजेंद्र सोनावणे), उत्कृष्ट कविता कोण असे तु ( इंद्रधनू, विजय इंद्रकेशव ), उत्कृष्ट व्यंगचित्र विवेक मेहेत्रे (साहित्य आभा) यांनी पटकाविले. या स्पर्धेचे परिक्षक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक अविनाश कोल्हे, मंजुषा कुलकर्णी व सुनिल धोपावकर यांनी काम पाहिले.
- बक्षिसांचे स्वरूप –
राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा
प्रथम क्रमांक – ०१ लाख रुपये, सन्मानचिन्ह
व्दितीय क्रमांक – ५० हजार रुपये, सन्मानचिन्ह
तॄतीय क्रमांक – ३० हजार रूपये, सन्मानचिन्ह
उत्तेजनार्थ २ बक्षिसे- प्रत्येकी ५ हजार रुपये, सन्मानचिन्ह
उत्कॄष्ट विशेषांक १५ हजार रुपये, सन्मानचिन्ह
उत्कृष्ट दिवाळी अंक – १५ हजार रुपये, सन्मानचिन्ह
उत्कृष्ट कथा- ७ हजार रुपये, सन्मानचिन्ह
उत्कृष्ट कविता- ५ हजार रुपये, सन्मानचिन्ह
उत्कृष्ट मुखपृष्ठ – ५ हजार रुपये, सन्मानचिन्ह
उत्कृष्ट लेख- ५ हजार रुपये, सन्मानचिन्ह
लक्षवेधी परिसंवाद – ५ हजार रुपये, सन्मानचिन्ह
लक्षवेधी ,मुलाखत – ५ हजार रुपये, सन्मानचिन्ह
रायगड जिल्हास्तरीय –
प्रथम क्रमांक – ४० हजार रुपये, सन्मानचिन्ह
व्दितीय क्रमांक- २० हजार रुपये, सन्मानचिन्ह
तॄतीय क्रमांक – १० हजार रूपये, सन्मानचिन्ह
उत्तेजनार्थ २ बक्षिसे- प्रत्येकी ५ हजार रुपये, सन्मानचिन्ह
उत्कृष्ट कथा- ३ हजार रुपये, सन्मानचिन्ह
उत्कृष्ट कविता- ३ हजार रुपये, सन्मानचिन्ह
उत्कृष्ट मुखपृष्ठ – ३ हजार रुपये, सन्मानचिन्ह
डिजिटल दिवाळी अंकालाही मिळणार पाठबळ
परदेशात असलेल्या मराठी माणसाला दिवाळी अंक वाचनाची आवड आहे. मात्र तो भारतात येऊन अंक घेऊ शकत नाही, त्यामुळे डिजिटल आवृत्तीला त्याची पसंती असते. आणि त्यामुळे आता डिजिटल अंकांची जास्तीत जास्त निर्मिती होऊन हि वाचनाची भूक भागवण्यासाठी डिजिटल दिवाळी अंकांनाही पुरस्कार देण्याची विनंती मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे यांनी यावेळी केली. आणि यावर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी हिरवा कंदील देत येत्या दिवाळी अंक स्पर्धेपासून डिजिटल अंकांना पुरस्कार देण्याची घोषणा केली. त्यामुळे आता डिजिटल दिवाळी अंकालाही पाठबळ मिळणार आहे.
माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्याकडून मराठी साहित्य विश्वाला पुरस्कृत करण्याचे काम – डॉ. रवींद्र शोभणे
मराठी माणूस नाटक, दिवाळी अंक आणि साहित्य संमेलन हे तीन वेड जपतात. आणि त्या अनुषंगाने दिवाळी अंक वाचन संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे. दिवाळी अंकांनी साहित्य परंपरा जपली मात्र दिवाळी अंक जाहिरातींच्या मदतीशिवाय उभा राहू शकत नाही. दिवाळी अंक शब्द साहित्याची परंपरा असून साहित्य क्षेत्रातील बदल दिवाळी अंकांनी आत्मसात केले आहे. दिवाळी अंक म्हणजेच शिस्तीचे लेखन असते. आपल्या लेखनात बदल करू नये असा अट्टाहास लेखकाचा असतो मात्र ज्यावेळी गरज पडेल त्या ठिकाणी लेखकाच्या लेखनात आवश्यक सुधारणा करण्याचे काम संपादकांनी केले पाहिजे. मराठी साहित्य विश्व समृद्ध करण्याचे काम लेखकांनी केले आहे. राजकीय लोकांकडून साहित्याबद्दल प्रेम क्वचितच दिसते पण याला माजी खासदार रामशेठ ठाकूर अपवाद आहेत त्यांचा मराठी साहित्यवरील प्रेम नेहमीच अधोरेखित झाले आहे. साहित्य विश्वाला उंची देण्याचे काम होत असताना या विश्वाला पुरस्कृत करण्याचे काम माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केले आहे. आणि हे औदार्यपूर्ण काम असून या कामाचे मोल पाहून मी नागपूरहून या सोहळ्याला हजर झालो आहे.
घरात शोकेस नसला तरी चालेल पण बुककेस हवा- सुप्रसिद्ध कवयित्री व लेखिका नीरजा
कुठल्याही देशात भौतिक आर्थिक आलेखापेक्षा सांस्कृतिक आलेख महत्वाचा आहे. त्यामुळे संस्कृतीची व्याख्या लोप पावून चालणार नाही. संस्कृती म्हणजे फक्त धर्म, सण, उत्सव नाही तर कला, विज्ञान,वाचन, तत्वज्ञान हे पण तितकेच महत्वाचे आहे. संस्कृती समुद करण्यासाठी बौद्धिक पातळी वाढविणे गरजेचे आहे. वाचन संस्कृतीला अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे ती वृद्धिंगत होणे गरजेचे आहे. दिवाळी अंकाची परंपरा मोठी असून पोटाची भूक, भावनिक आणि बौद्धिक भूक भागवण्याचे काम दिवाळी अंकातून होत आहे. वाचन संस्कृती आणि बौद्धिक क्षमता वाढली पाहिजे, यासाठी घरात शोकेस नसला तरी चालेल पण बुक केस असला पाहिजे. दिवाळी अंक भाषा आणि दिशा देतात आणि त्यासाठी हि सर्व माणसे झटत असून माजी खासदार रामशेठ ठाकूर हे मराठी शब्द साहित्यासाठी काम करीत आहेत.
सर्वांच्या सहभागातून स्पर्धा मोठी झाली- आमदार प्रशांत ठाकूर
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली १९९६ सालपासून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील उपक्रमे अखंडपणे सुरु आहेत. यामध्ये दिवाळी अंक स्पर्धा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेपासून सुरु झालेली हि स्पर्धा राज्यस्तरीय स्पर्धा झाली आणि या स्पर्धेला मुंबई मराठी पत्रकार संघाची गेली अनेक वर्षे साथ लाभली आहे. आणि सर्वांच्या सहभागातून हि स्पर्धा मोठी झाली, त्यामुळे सर्वांचे मनःपूर्वक आभार!
देशातील सर्वात मोठी दिवाळी अंक स्पर्धा- संदीप चव्हाण
दिवाळी अंक हि पूर्वापार पासून चालत आलेली परंपरा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली आणि महाराष्ट्रात नाही तर देशातील सर्वात मोठी दिवाळी अंक स्पर्धा आहे. आणि हे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यामुळे शक्य झाले आहे.