पनवेल दि.२४: भाजप जगातील एक नंबरचा पक्ष आहे आणि त्या पक्षातील निवडून आलेले ग्रामपंचायतीचे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, त्यामुळे गावांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत रहा, असे आवाहन भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज येथे केले.
देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती व सुशासन दिनानिमित्त उत्तर रायगड भाजपच्यावतीने पनवेल, उरण, कर्जत व खालापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार सोहळा भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
या सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, श्रीनंद पटवर्धन, नीलकंठ घरत, पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक बबन मुकादम, अल्पसंख्याक नेते मन्सूर पटेल, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अमरीश मोकल, शिवाजी दुर्गे, अशोक साळुंखे, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे म्हंटले कि, आम्हाला तुमचा अभिमान आहे पण त्याचबरोबरीने तुमच्या विजयासाठी युवा, महिला, ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आहे, त्यांचे मी विशेष अभिनंदन करत आहे. निवडून आलो म्हणून ती हवा डोक्यात न आणता पाय जमिनीवर ठेवून गावांच्या विकासासाठी काम केल्यास पुढील काळातही यशस्वी मार्गक्रमणाची संधी असते त्यामुळे याकडे आपण कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. भाजप जिंकण्यासाठी नाही तर लोकांच्या कल्याणासाठी काम करीत आहे, त्यामुळे गावांच्या विकासाचे ध्येय्य कायम ठेवा, अशी सूचनाही त्यांनी केली. ज्या ग्रामपंचायतीत सदस्य संख्या कमी होती त्या ठिकाणी सदस्य संख्या वाढवण्याबरोबरच सरपंच पदाची बाजी आपण सर्वानी मारली आहे. या यशातून आपल्या सर्वाना मार्गक्रमण करताना आगामी विविध निवडणुकीत दैदिप्यमान यश मिळवायचे आहे आणि त्यासाठी तशी मेहनत करा, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधोरेखित केले.
यावेळी बोलताना आमदार महेश बालदी यांनी सांगितले कि, मागील काळात ज्या ठिकाणी आपल्याकडे सदस्य नव्हते त्या ठिकाणीही चार पाच पक्ष एक करत विरोधकांनी निवडणूक लढवली पण आपण एकटे आणि काही ठिकाणी आपल्यासोबत मित्रपक्ष असताना आपण विरोधकांना निवडणुकीत धूळ चारली आहे. आता ग्रामपंचायतीचा कारभार चालवताना गावांचा विकास परिपूर्ण कसा होईल त्याकडे लक्ष केंद्रित करा, विकासासाठी निधीची कमी नाही, काम करण्याची इच्छाशक्ती हवी आणि ती तुमच्यात आहे, काम करा गावाचा विकास करा निधीची कमतरता पडणार नाही, असे आमदार महेश बालदी यांनी आश्वासित केले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!