पनवेल दि.२५ (संजय कदम) : पनवेल शहरातील उत्तर रायगड जिल्हा भाजपा उपाध्यक्ष गणेश कडू यांची कन्या वैष्णवी गणेश कडू हिने कमर्शियल पायलट प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करत संपूर्ण रायगड जिल्ह्याचा अभिमान वाढवला आहे. बालपणापासूनच विमान चालवण्याचं स्वप्न मनात बाळगलेल्या वैष्णवीने चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केलं आहे.
वैष्णवीच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिच्या कुटुंबासह संपूर्ण पनवेल परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे. तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत असून, ती अनेक तरुणींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
“वैष्णवीच्या यशामुळे रायगड जिल्ह्यातील प्रत्येक मुलीला मोठी स्वप्ने पाहण्याचं आणि ती पूर्ण करण्याचं बळ मिळालं आहे,” अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
या प्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर यांनीही वैष्णवीच्या यशाचं कौतुक करत तिचं अभिनंदन केलं. “वैष्णवी गणेश कडू हिने कमर्शियल पायलट प्रशिक्षण पूर्ण करून तिच्या स्वप्नांना उंच भरारी दिली आहे. तिच्या या यशामुळे केवळ कडू कुटुंब नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्याचा अभिमान वाढला आहे,” असे आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.
उत्तर रायगड जिल्हा भाजपा उपाध्यक्ष गणेश कडू यांच्या कन्येच्या या यशाबद्दल आमदार ठाकूर यांनी हार्दिक अभिनंदन व्यक्त करत वैष्णवीला तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आता वैष्णवी आंतरराष्ट्रीय विमानसेवा क्षेत्रात करिअर घडवण्याचा मानस बाळगते आहे. तिच्या या यशामुळे पनवेल व रायगड जिल्ह्यातील अनेक तरुणींच्या मनात उंच भरारी घेण्याचं नवं स्वप्न साकार झालं आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!