नवी मुंबई दि.23: सध्या जगभर पसरलेल्या कोविड – १९ या राष्ट्रीय आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सिडको महामंडळाने पाण्याची देयके सुधारित दराने वसूल करण्याचा निर्णय ६ महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना या निर्णयाच्या अनुषंगाने सुधारित देयके दिली जाणार नाहीत. सुधारित दरानुसार यापूर्वी आकारण्यात आलेली देयकाची अतिरिक्त रक्कम पुढील देयकामध्ये जुन्या दरांनुसार आकारण्यात येईल. इतर शासकीय यंत्रणांकडून पाण्याची खरेदी व त्याचप्रमाणे पाणी पुरवठ्याची साधने आणि पाईपलाईन्सच्या देखभालीसाठी येणारा खर्च लक्षात घेता सदरची दरवाढ ही तब्बल १५ वर्षांनंतर म्हणजेच बऱ्याच कालावधीने करण्यात आली होती.
नवी मुंबई क्षेत्रातील सिडकोच्या व्यापारी, सामाजिक व धर्मादाय संस्था तसेच निवासी वापराच्या नळ जोडण्यांकरिता आणि सिडकोच्या हेटवणे धरणातून पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या गावांकरिता फेब्रुवारी-मार्च 2020 च्या देयकापासून सुधारित पाणी दर लागू करण्यात आली होती. सदरची दरवाढ ही जानेवारी २०२० पासून करून फेब्रुवारी – मार्च २०२० च्या देयकात समाविष्ट करण्यात आली होती.
कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर सिडकोतर्फे घेण्यात आलेला निर्णय ग्राहकांसाठी या कठीण काळात नक्कीच दिलासादायक ठरेल.
