मुंबई, दि. 2: किल्ले रायगडाच्या पायथ्याशी ४५ एकरात शिवसृष्टी उभारण्यासाठी राज्य शासन ५० कोटी रुपयांचा निधी देणार आहे तसेच प्रतापगडाच्या संवर्धनासाठी राज्य शासन प्राधिकरण निर्माण करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडावर झालेल्या ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यात केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार सुनील तटकरे, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर तसेच इतर लोकप्रतिनिधी, मान्यवर तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य गोरगरीब रयतेचे राज्य होते. त्यांनी जातिभेद केला नाही, शिवाजी महाराजांनी महिलांना पुढे येण्याची संधी दिली. महाराज त्यांच्या राज्यकारभाराच्या पद्धतीमुळे लोकप्रिय होते, जनतेची काळजी घेणारा हा राजा होता. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण डोळ्यासमोर ठेवून कारभार करतोय, याचा आम्हाला अभिमान आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा देण्याची योजना केलेली आहे. केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणे राज्य सरकारनेदेखील ‘नमो शेतकरी सन्मान निधी’ योजना सुरु केली आहे. सिंचन वाढीसाठी सरकारने अनेक निर्णय घेतले असून जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु केली आहे. प्रतापगडाच्या संवर्धनासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासन प्राधिकरण निर्माण करणार आहे. मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त राज्यभर वर्षभरात विविध कार्यक्रम होणार असून त्याचा प्रारंभ १ जूनपासून करण्यात आला आहे.