पनवेल दि८ : मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलजवळील चिंचवण गावाच्या परिसरात आज सकाळी उभ्या शिवशाही बसला पाठीमागून भरधाव वेगाने येणार्या इर्टिका कारने धडक दिली असता या अपघातात कारमधील एक जण ठार, तर तीन महिला जखमी झाल्या आहेत.
ठाणे येथील इव्हेंट मॅनेजमेंट करणारे सुप्रसिद्ध निवेदक दीपेश मोरे हे सहकार्यांसह महाड येथील कार्यक्रम आटोपून आज सकाळी परतत होते. त्यांच्याकडील इर्टिका कार (एमएच 04 जीएम 2495) घेऊन ते चिंचवण गावाच्या हद्दीत आले असता शिवशाही बसचा टायर पंक्चर झाल्याने ती रस्त्यावर उभी होती. याचा अंदाज चालकाला न आल्याने इर्टिका कार शिवशाही बसला पाठीमागून धडकली. या अपघातात कारमधील दीपेश मोरे गंभीररीत्या जखमी होऊन मृत्यू पावले, तर त्यांच्यासोबत असलेल्या सहकारी रश्मी खावणेकर या जखमी झाल्याने त्यांना पनवेलच्या लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे श्रद्धा जाधव व कोमल माने किरकोळ जखमी झाल्या आहेत. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.