पनवेल दि.१०:पनवेल महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या आणि सिडकोने विकसित केलेल्या नोड्समधील विविध सेवांचे हस्तांतरण आज पनवेल महानगरपालिकेकडे करण्यात आले. याबाबतचा हस्तांतरण करार आज विधानभवनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत पार पडला. या करारावर सिडको महामंडळातर्फे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी तर पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांनी स्वाक्षन्या केल्या.
यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री महोदयांचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, उपमुख्यमंत्री महोदयांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एमएसआरडीसी राधेश्याम मोपलवार, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, उपायुक्त सचिन पवार, तसेच महापालिका आणि सिडको महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
दिनांक १ ऑक्टोबर २०१६ ला पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाल्यावर प्रशासकीय सुसूत्रता आणण्यासाठी तसेच नागरिकांना एकाच छताखाली सर्व सोयीसुविधा मिळण्यासाठी सिडकोकडील सेवा सुविधा महापालिकेकडे हस्तांतरीत होणे गरजेचे होते. याचाच एक भाग म्हणून प्रथमतः २०१८ ला सिडकोकडोल घनकचरा व्यवस्थापनाची सेवा महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आली होती. तर आता पाणीपुरवठा वगळून उर्वरीत सर्व सेवा महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आल्या आहेत. घनकचरा व्यवस्थापन महानगरपालिकेकडे आल्यापासून महानगरपालिकेने उत्कृष्ट धनकचरा व्यवस्थापनाबाबत राष्ट्रीय स्तरावर मानांकनही प्राप्त केले आहे.
आज महानगरपालिकेकडे हस्तांतरीत झालेल्या सेवांमध्ये फूटपाथ, रस्ते, पथदिवे, विद्युत सेवा. सीवर लाईन्स, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, सांडपाणी पंप हाऊस, अग्निशमन केंद्र उपकरण, स्मशानभूमी दफन भूमी (स्मशानभूमी), गार्डन, कम्युनिटी सेंटर, खेळाची मैदाने इत्यादींचा समावेश आहे. येथून पुढे या सर्व पायाभूत सुविधांची देखभाल दुरूस्ती सुधारणा तसेच विकास ही कामे पनवेल महापालिकेच्यावतीने करण्यात येणार आहेत.