पनवेल दि.८: खारघर,नवी मुंबई येथील मोबाईल शोरूमचे शटर गॅसकटरने कट करून घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा नवी मुंबई यांचेकडुन अटक केली असून सुमारे ४५ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दिनांक ३० ऑगस्ट रोजी रात्रौ दरम्यान, शिव इलेक्ट्रॉनिक्स, खारघर, नवी मुंबई या मोबाईल शोरूमचे मध्यरात्री शटर गॅस कटरने कट करून सुमारे ५० लाख किंमतीचे महागडे मोबाईल लॅपटॉप रोख रक्कम घरफोडी करून चोरून नेल्याने खारघर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
नवी मुंबईचे नवनिर्वार्चित पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग व अपर पोलीस आयुक्त, डॉ. जय जाधव, पोलीस उप आयुक्त, प्रविणकुमार पाटील, सुरेश मेंगडे, सहायक पोलीस आयुक्त, विनोद चव्हाण यांनी गुन्हा उघडकीस आणणे व तपासाबाबत मार्गदर्शन केले.
गुन्हेगारांनी सदरचा गुन्हा नियोजनरीत्या व त्यांची ओळख पटु नये म्हणुन शोरूममधील डी.व्हि.आर. काढुन मोबाईलचे शोरूम फोडुन लाखो रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरी करून नेला होता. सदर गुन्हयाचा समांतर तपास चालु असताना मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पालीस निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांना नमुद गुन्हयातील आरोपींबाबत खात्रीशीर मिळालेली गोपनिय माहीतीच्या आधारे मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेवुन धारावी, मुंबई येथुन आरोपी अयान उर्फ निसार उर्फ बिटु रफी अहमद शेख, शफिकउल्ला उर्फ सोनु अतिकउल्ला, इम्रान मोहमद उर्फ इम्मु बिंदु अन्सारी यास ताब्यात घेतले. गुन्हयाचे अनुषंगाने केलेल्या चौकशीमध्ये नमुदचा गुन्हा केला असल्याची त्यांनी कबुली दिल्याने दिनांक ४ सप्टेंबर रोजी त्यांना अटक करण्यात आलेली असुन दिनांक ११/०९/२०२० रोजीपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी मिळालेली आहे.
गुन्हयाचे तपासा दरम्यान नमुद आरोपींकडुन गुन्हयातील सुमारे ४५ लाख रूपये किंमतीचे मोबाईल, लॅपटॉप, डी.व्हि.आर. इत्यादी हस्तगत करण्यात आले आहे. तसेच नमुद गुन्हयात वापरण्यात आलेली टॅक्सी ही आरोपींनी दि. १४.०८.२०२० रोजी कुर्ला प. येथुन चोरी केलेली होती. त्याबाबत कुर्ला पो.ठाणे येथे गुन्हा दाखल असुन तो ही उघडकीस आलेला आहे. सदरचे आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन याचेवर १७ अशा प्रकारचे मुंबई, ठाणे ग्रामिण , पालघर येथे गुन्हे दाखल आहेत.