उरण दि.7(विठ्ठल ममताबादे) स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांती दिन ते स्वातंत्र्य दिन म्हणजेच 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान राज्यभर आझादीका गौरव झेंडा महोत्सव आयोजित केला आहे. रायगड जिल्ह्यात काँग्रेसचे रायगड जिल्ह्याध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी, जनतेने या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी उलवे येथील पत्रकार परिषदेत केली.
स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षा निमित्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे दिनांक 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान देशातील प्रत्येक जिल्ह्यात 75 किलोमीटर आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन केले आहे.त्याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील आझादी गौरव पदयात्रे संबंधित माहिती देण्यासाठी रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांनी शनिवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी काँग्रेस पक्ष कार्यालय, उलवे नोड,प्लॉट नं -100,सेक्टर -18 येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत माजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पदयात्रे विषयी पत्रकार परिषदेत पत्रकारांना माहिती दिली.
रायगड जिल्ह्यातील पदयात्रे विषयी जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.पदयात्रा 9 ऑगस्ट रोजी नंदराज मुंगाजी व संजय ठाकूर यांच्या नेतृत्वात जासई येथील हुतात्म्यांना अभिवादन करून पदयात्रेला सुरुवात होऊन, विनोद म्हात्रे व बाजीराव परदेशी यांच्या नेतृत्वात पागोटे येथील हुतात्म्यांना वंदन केले जाईल. तदनंतर, उरण तालुक्यातील चिरनेर येथे हुतात्म्यांना मानवंदना करून पुनाडे पर्यंत पदयात्रा होईल. 10 ऑगस्ट रोजी नंदाताई म्हात्रे व अशोक मोकल यांच्या नेतृत्वात पेण तालुक्यातील विनोबा भावे यांच्या जन्मस्थळापासून गांधी मंदिर पेण पर्यंत पदयात्रा होईल. 12 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या समाधीस अभिवादन करून जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत व नाना जगताप, स्नेहल जगताप यांच्या नेतृत्वात पदयात्रा किल्ले रायगड ते महाड शहरातील चवदार तळे याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून केली जाईल. 13 ऑगस्ट रोजी महिला जिल्हाध्यक्षा श्रद्धा ठाकूर आणि योगेश मगर यांच्या नेतृत्वात रेवदंडा नाका चोंढी मार्गे स्वातंत्र्य सैनिक स्तंभापर्यंत पदयात्रा काढण्यात येईल. आणि 14 ऑगस्ट रोजी मिलिंद पाडगांवकर व शिवाजी खारीक यांच्या नेतृत्वात कर्जत तालुक्यातील नेरळ हुतात्मा चौकापासून मानवली कर्जत ते हुतात्मा स्मारकापर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी दिली. या पद यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महेंद्र घरत यांनी पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिकांना केला आहे.
पदयात्रेदरम्यान स्वातंत्र्यासाठी संघर्ष केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे ऋण व्यक्त करण्याची संधी आझादी गौरव पदयात्रेच्या निमित्ताने मिळत आहे हे परमभाग्य आहे. असे मत मांडत, जे स्वातंत्र्यसैनिक हयात आहेत त्यांच्या घरी जाऊन त्यांचे चरणस्पर्श करणे व जे स्वातंत्र्यसैनिक हयात नाहीत त्यांच्या वीरपत्नी व वारस यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांचा यथोचित सन्मान करणार असल्याचेही महेंद्र घरत यांनी यावेळी सांगितले.
यावेळी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष चारूलता टोकस, प्रदेश सचिव चंद्रकांत पाटील, महिला जिल्हाध्यक्षा श्रद्धा ठाकूर, नंदराज मुंगाजी,रायगड जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, मच्छिमारांचे नेते मार्तंड नाखवा, अकलाख शिलोत्री, राजाभाऊ ठाकूर, वैभव पाटील, नाना जगताप, धनंजय चाचड, रेखा घरत यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.