पनवेल दि.६: आंतरराष्ट्रीय जलतरणपटू प्रभात कोळीने अमेरिकेतील लेक टाहो (३५ किमी) अंतर १२ तास ३७ मिनिटात पार केले असून अशी कामगिरी करणारा आशिया खंडातील प्रथम जलतरणपटू होण्याचा मान प्रभातने मिळवला आहे. त्याचप्रमाणे वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग असोसिएशनचा कॅलिफोर्नियन ट्रिपल क्राऊन पटकावणारा देखील आशिया खंडातील तो पहीला जलतरणपटू ठरला.
कॅलिफोर्नियन ट्रिपल क्राऊन या वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग असोसिएशनच्या नामांकनामध्ये अमेरिकेतील कॅटलिना चॅनेल (३४ किमी) सान्ताबार्बारा चॅनेल (२० किमी) तसेच लेक टाहो लेंगथ स्विम (३५ किमी ) या अतिशय खडतर जलतरण मोहिमांचा समावेश आहे प्रभात कोळी ने हि तिन्ही आव्हाने यशस्वीरित्या पार करत आशिया खंडातील प्रथम जलतरणपटू चा मान मिळविला. त्याचप्रमाणे आपल्या देशाचे नाव लौकिक वृद्धिगंत करण्याचे काम केले. लेक टाहो मध्ये जलतरण करण्यासाठी प्रभातने प्रथम पनवेल तालुक्यात उलवा नोड येथे असलेल्या रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या स्विमिंग पूल मध्ये सराव केला असून सरावासाठी जलतरण तलाव उपलब्ध करून दिल्याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रभातने विशेष आभार मानले.
प्रभातने कॅटलिना चॅनेल २०१६ मध्ये सांताबार्बरा येथील चॅनेल २०१९ मध्ये व लेक टाहो लेंग्थ स्विम हे आव्हान ३० जुलैला पार केले. समुद्र सपाटी पासून १८०० मीटर उंचीवर स्थित लेक टाहो लेंग्थ (३५ किमी ) पोहणे अतिशय खडतर आव्हान समुद्रसपाटी पासून उंचीवरील विरळ ऑक्सिजन असल्यामुळे पाण्याची घनता कमी त्यात पोहण्यास अतिशय कठीण, शिवाय जलतरणाची वेळ रात्रीची, या सर्व आव्हानांवर मात करत प्रभातने हि मोहीम फत्ते केली.
समुद्र सपाटी पासून उंचीवर ऑक्सिजन विरळ होतो हे जलतरणासाठी अधिक त्रास दायक असते. त्यासाठी उत्तराखंड राज्यातील समुद्रसपाटी पासून २००० मीटर उंचीवर स्थित नैनिताल येथील नैनी लेक मध्ये प्रभातने सराव केला त्यासाठी तेथील स्थानिक लोकांचे सहकार्य मिळाले.प्रभातने ट्रिपल क्राऊन ऑफ ओपन वॉटर हे नामांकन २०१७ मध्ये पटकावले होते. हा पराक्रम करणारा तो जगातील सर्वात तरुण जलतरणपटू होता. त्याच बरोबर सात समुद्रांच्या आव्हानांपैकी सहा आव्हाने फत्ते करणारा जगातील सर्वात तरुण जलतरणपटू. आजतागायत आंतरराष्ट्रीय १८ जलतरणाच्या मोहीम फत्ते करणारा एकमेव भारतीय जलतरणपटू. अनेक विक्रमाने सन्मानित प्रभातला भारत सरकारने तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते २०१९ साली गौरवण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्राचा सर्वोच्च शिवछत्रपती पुरस्काराने २०२० मध्ये सन्मानित करण्यात आले आहे. प्रभातच्या पराक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डस् करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रभातच्या नावावर लिमका बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये ५ विक्रमांची नोंद करण्यात आली आहे.