रायगड जिल्ह्यात 7 विधानसभा मतदार संघ
प्रत्येक मतदार संघाचे एकूण मतदार किती?
जाणून घ्या

रायगड जिमाका दि १६: भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहिर केला आहे. रायगड जिल्ह्यात 7 विधानसभा मतदार संघांसाठी दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडावी यासाठी आचारसंहितेच्या काटेकोर व प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्यात येणार असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या पत्रकार परिषदेस पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे आदी उपस्थित होते.

केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेला विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे :
मंगळवार 15 ऑक्टोबर 2024 रोजी निवडणुकीची घोषणा आणि प्रेसनोट जारी करणे
मंगळवार 22 ऑक्टोबर 2024 रोजी राजपत्र अधिसूचना जारी करणे
मंगळवार 29 ऑक्टोबर 2024 नामांकन करण्याची शेवटची तारीख,
बुधवार 30 ऑक्टोबर 2024 नामांकन छाननीची तारीख
सोमवार 04 नोव्हेंबर 2024 उमेदवारांनी माघार घेण्याची शेवटची तारीख
बुधवार 20 नोव्हेंबर 2024 मतदानाची तारीख
शनिवार 23 नोव्हेंबर 2024 मतमोजणी
सोमवार 25 नोव्हेंबर 2024 निवडणूक समाप्त.

रायगड जिल्ह्यात 7 विधानसभा मतदार संघ
रायगड जिल्ह्यात 188-पनवेल, 189-कर्जत, 190-उरण, 191-पेण, 192-अलिबाग, 193-श्रीवर्धन, 194-महाड असे 7 विधानसभा मतदार संघ आहेत. यामध्ये एकूण 2 हजार 790 मतदान केंद्र आहेत. निवडणूक कामासाठी पुरेसे मनुष्यबळ जिल्ह्यात उपलब्ध आहे. एकूण 17 हजार 497 कर्मचारी असून प्रत्यक्ष कामकाजसाठी 13 हजार 955 मनुष्यबळ आवश्यक आहे.

मतदार संघाचे एकूण मतदार
रायगड मतदार संघात एकूण 24 लाख 68 हजार 120 मतदार आहेत. यामध्ये पुरुष 12 लाख 50 हजार 256 मतदार तर महिला 12 लाख 17 हजार 775 मतदार तर तृतीय पंथी 89 आहेत. तर दिव्यांग 13 हजार 48 तर 18 -19 वयोगटातील 51 हजार 612 मतदार आहेत. तर 85 पेक्षा अधिक वयोगटातील 35 हजार 859 मतदार आहेत.
188-पनवेल – पुरुष 3 लाख 43 हजार 511 मतदार तर महिला 3 लाख 2 हजार 333 मतदार तर तृतीय पंथी 73 असे एकूण 6 लाख 45 हजार 917 आहेत.
189-कर्जत – पुरुष 1 लाख 58 हजार 394 मतदार तर महिला 1 लाख 58हजार 206 मतदार तर तृतीय पंथी 3 असे एकूण 3 लाख 16 हजार 603 आहेत.
190-उरण – पुरुष 1 लाख 68 हजार 712 मतदार तर महिला 1 लाख 67 हजार 501 मतदार तर तृतीय पंथी 12 असे एकूण 3 लाख 36 हजार 225 आहेत.
191-पेण – पुरुष 1 लाख 54 हजार 20 मतदार तर महिला 1 लाख 52 हजार 532 मतदार असे एकूण 3 लाख 6 हजार 561 आहेत.
192-अलिबाग – पुरुष 1 लाख 49 हजार 474 मतदार तर महिला 1 लाख 54 हजार 122 मतदार, तर तृतीय पंथी 1 असे एकूण 3 लाख 3 हजार 597 आहेत.
193-श्रीवर्धन – पुरुष 1 लाख 29 हजार 436 मतदार तर महिला 1 लाख 34 हजार 485 मतदार असे एकूण 2 लाख 63 हजार 921 आहेत.
194-महाड – पुरुष 1 लाख 46 हजार 700 मतदार तर महिला 1 लाख 48 हजार 596 मतदार असे एकूण 2 लाख 95 हजार 296 आहेत.

नागरिकांच्या सोयीसाठी विविध ॲप
तक्रार करण्यासाठी स्वतंत्र ॲप

या निवडणुकीत cVIGIL ॲपचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणत्याही सामान्य नागरिकाला जर निवडणुकीत काही अफरातफर दिसून आली तर या ॲपवर जाऊन त्याची माहिती द्यायची आहे. फोटो अपलोड करण्याचीही सुविधा आहे. ज्या व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे त्याच्या लोकेशनवरून निवडणूक आयोगा सदर परिसराचा माग काढेल आणि 100 मिनिटांच्या आत आयोगाचे पथक त्याठिकाणी दाखल होईल.
मतदारसंघातील उमेदवारांची माहिती मिळवायची असेल तर मतदारांना Know Your Candidate (KYC-ECI) या ॲपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राजकीय जाहिरातींच्या प्रसारण पूर्व प्रमाणीकरणासाठी सर्व संबंधित राजकीय पक्ष ‘माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडे संपर्क करतील. त्यानुषंगाने आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे.

निवडणुकीसाठी जिल्हा यंत्रणा सज्ज
स्वतंत्र आणि निशपक्ष निवडणूक घेण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. निवडणुक कर्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 22 समित्या नेमण्यात आल्या आहेत. तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यामध्ये समाजातील सर्व घटकांचा समावेश करण्यात येणार आहे.

🛑Navi Mumbai Airport Flight Testing
🔸नवी मुंबई विमातनळावर उतरलं पहिलं विमान
🔹भारतीय वायुदलाच्या सी 295 विमानाचं यशस्वी लँडिंग

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!