पनवेल दि.९: रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात कला मंच व कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) केंद्र उभारण्यात आले असून या केंद्राचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते झाले. तसेच वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदरचे महाविद्यालय अत्यंत दुर्गम भागात असले तरी येथील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भरीव मदत केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीला चालना मिळत असून आधुनिकीकरणाच्या युगात यशस्वी मार्गक्रमण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व प्रणालींचा उपयोगही येथे करण्यात येणार आहे. यावेळी बोलताना चेअरमन दळवी यांनी सांगितले की, आजचे युग तंत्रज्ञानाचे युग असून एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता ही भविष्यातील प्रगतीची महत्त्वाची दिशा ठरत आहे. शिक्षण क्षेत्रात एआयचा वापर वाढत असून त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या आणि संशोधनाच्या अनेक नव्या संधी उपलब्ध होत आहेत. येथील महाविद्यालयात एआय केंद्राची स्थापना ही अत्यंत स्तुत्य बाब असून यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होईल आणि त्यांच्या कौशल्य विकासाला चालना मिळेल. विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून नव्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहनही चंद्रकांत दळवी यांनी केले. तसेच या महाविद्यालयाचा ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून गौरव केला.
संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या कार्याचा गौरव केला. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम बनविण्याचे कार्य संस्थेने सातत्याने केले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शाळेच्या विकासासाठी आणखी ३८ लाख रुपयांची देणगी जाहीर केली. यापूर्वीदेखील शाळेच्या विकासासाठी त्यांनी ६२ लाख रुपयांची देणगी दिली होती.कार्यक्रमात महाविद्यालयाच्या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला आमदार सुनील भुसारा, नगराध्यक्ष अमोल पाटील, संस्थेचे व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव एस.टी. गडदे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य प्रकाश निकम, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!