मुंबई, दि.१७ :- कोरोना प्रतिबंधात्मकात्मक नियम व उपायांचे सक्तीचे पालन करत राज्यातील जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा दसऱ्यापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा या जनतेच्या आरोग्यासाठीच आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जास्तीत जास्त काळजी घेण्यात यावी. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘एसओपी’चे काटेकोर पालन करण्यात यावे असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा यांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या चर्चेत ते बोलत होते.
जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा याठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘एसओपी’चे काटेकोर पालन करण्याची ग्वाहीही या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना दिली. पण स्टिम बाथ, सौना, शॉवर आणि झुंम्बा, योगा असे सामुहीक व्यायाम प्रकार ‘एसओपी’तील निर्देशानुसार पूर्णपणे बंद राहणार असल्याचेही सांगण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, डॉ. शशांक जोशी तसेच महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशनचे निखिल राजपुरीया, ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य, करण तलरेजा, अभिमन्यू साबळे, महेश गायकवाड, हेमंत दुधवाडकर, साईनाथ दुर्गे, राजेश देसाई, योगिनी पाटील आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, जिम, व्यायामशाळा या आरोग्यासाठीच आहेत. पण त्यामुळे आरोग्याचे प्रश्न वाढू नयेत याची काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे मोठया शहरांबरोबच राज्यातील ग्रामीण भागातही जिम, व्यायामशाळा यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे हा निर्णय घेताना तयार करण्यात आलेली ‘एसओपी’चे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. हा व्यवसाय आहे, पण तसा तो जनतेच्या आरोग्याशी निगडीत आहे, याची काळजी घेणे आवश्यक आहे. आता रुग्ण संख्या कमी होते आहे. पण युरोप खंडातील उदाहरणांवरून आपल्याला सावधही रहावे लागेल. आपण अनेक निर्बंध शिथील करत आहोत. पण यातून हळू-हळू गाफीलपणा वाढू नये यासाठी सर्वच घटकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
उपचारांसाठी आपण मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण केल्या आहेत. आता रुग्ण कमी होण्यामुळे रुग्णशय्या रिकाम्या राहू लागल्या आहेत. त्या रिकाम्याच रहाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोरोना प्रतिबंधात्मक उपायांकडे दुर्लक्ष झाल्यास, आहे त्या सुविधांवरही अचानक ताण येऊ नये याची खबरदारी घ्यावी लागेल. कारण उपकरणे, सुविधा म्हणजे रुग्णशय्या, व्हेंटीलेटर्स, रुग्णवाहिका या यापुर्वीच आपण पुरेश्या संख्येने उपलब्ध केल्या आहेत. त्या आणखीही वाढविता येतील. पण त्यासाठी लागणारे डॉक्टर्स, परिचारिका असे चांगले मनुष्यबळ उभे करणे मुश्किल होते. त्यामुळे विषाणू संसर्ग आटोक्यात येतो आहे, असे दिसतानाच, संसर्ग वाढू नये यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आपण जिम, व्यायामशाळांसाठी ‘एसओपी’ तयार केली आहे, आणि तिचे काटेकोरपालन होणे आवश्यक आहे. त्यामुळे या ‘एसओपी’चे पालन करण्याची जबाबदारी जिम, व्यायामशाळा यांच्या मालकांवर आहे. या ‘एसओपी’चे काटेकोर पालन न केल्यास, गलथानपणा आढळल्यास मात्र संबंधितावर कठोर कारवाई करणे भाग पडेल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!