सुरक्षित आणि निरोगी महाराष्ट्रासाठी आपण सगळे घेऊया, ‘MAH कसम’
रत्नागिरी दि. 18: कोरोना विरुद्धचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर  लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करुन द्या. कोरोनाची दुसरी लाट येऊ द्यायची नाही यासाठी MAH अर्थात मास्क, अंतर आणि हातांची स्वच्छता अशी ‘मां कसम’ सर्वांनी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपीसाठीच्या अफेरेसिस युनिटच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी केले.
दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्याने आज या सुविधेचे उद्घाटन झाले. जिल्हा रुग्णालयात अशी व्यवस्था उपलब्ध झालेला रत्नागिरी हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. या कार्यक्रमास पालकमंत्री ॲड. अनिल परब, सार्वजनिक आरोग्यमंत्री  राजेश टोपे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासोबतच खासदार विनायक राऊत सहभागी झाले. तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने,  आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम यांचीही उपस्थिती होती.
कोकणाला लाटांचा सामना कसा करायचा ते शिकवण्याची गरज नाही पण कोरोनाबाबत दुसरी लाट न येऊ देणे ही प्राथमिकता आहे.  कोरोनामुक्त झालेली एक व्यक्ती एका महिन्यात दोन वेळा प्लाझ्मा दान करुन चार जणांचा जीव वाचवू शकते. त्यामुळे येणाऱ्या काळात मृत्यूदर देखील कमी होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत रत्नागिरीत झालेले काम कौतुकास्पद आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की याच पद्धतीने आगामी काळात जाणीव जागृती करुन कोरोनाचा घसरता आकडा आणखी कमी करा. युरोपप्रमाणे पुन्हा लॉकडाऊन की मास्क, सुरक्षित अंतर आणि हातांची स्वच्छता याबाबत प्रत्येकापर्यंत जागृती करा.
जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या उपचार केंद्राबाबत माहिती दिली. उद्घाटनानंतर याबाबत चित्रफित दाखविण्यात आली.

इतर रोगांमध्येही फायदा

प्लाझ्मा अफेसेसिस युनिट मलेरिया, डेंग्यू तसेच इतरही अनेक आजारात मदत करणार आहे. यासाठी लागणारी यंत्रे 1 ते 2 लाखात येतील ती खरेदी करुन यातून कायमस्वरुपी उपचार व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी असे आरोग्यमंत्री श्री. टोपे याप्रसंगी म्हणाले. रत्नागिरीत घराघरापर्यत पोहोचून आरोग्ययंत्रणा व जिल्हा प्रशासनाने उत्तम कामगिरी केली याबद्दल त्यांनी अभिनंदनदेखील यावेळी केले.

मुख्यमंत्र्यांचे आभार

जिल्ह्याला आरटीपीसीआर प्रयोगशाळेची आवश्यकता आहे असे सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मान्यता दिली. त्यांच्याच संकल्पनेतून माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम सुरु झाली. यामुळे रत्नागिरीत कोरोनाची वाढ रोखण्यात यश आले याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो असे सांगून परिवहन तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी जिल्हा प्रशासनाचेही याबद्दल अभिनंदन केले.

ओसर सुरु

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून राबविलेल्या मोहिमेमुळे  रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये कोरोना नियंत्रणात आणता आला. रत्नागिरीत गेल्या 24 तासात एकाही मृत्यूची नोंद नाही हेदेखील त्यामुळेच शक्य झाले असे खासदार विनायक राऊत म्हणाले.

शून्याकडे वाटचाल

रोज 35 ते 40 रुग्ण पॉझिटिव्ह होणाऱ्या  रत्नागिरी तालुक्यासह लगतच्या माझ्या मतदारसंघात आता आकडा शून्यावर आला. यात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम व जिल्हा प्रशासन यांचे यश आहे असे सांगून  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपण लवकरच या प्लाझ्मा उपचार सुविधेतून मृत्यूदरदेखील एक टक्क्यांच्या खाली नेऊ असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बबिता कमलापूरकर आदींची या कार्यक्रमास उपस्थिती होती.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!