15 एप्रिलला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात गजलसम्राट सुरेश भट जयंतीनिमित्त
गजल व काव्यमैफल – ‘भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना”
पनवेल दि.१३: नवी मुंबई महानगरपालिकेचे ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक अल्पावधीतच देशातील सर्वोतम स्मारक म्हणून नावजले जात आहे. सव्वा वर्षातच 1 लाखाहून अधिक विविध स्तरातील देशी-परदेशी नागरिकांनी या स्मारकाला आवर्जून भेट देत हे बाबासाहेबांच्या ‘ज्ञान हीच शक्ती’ या विचारांवर आधारित ‘ज्ञानस्मारक’ असल्याचे अभिप्राय नोंदविलेले आहेत. या ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्याने नियमितपणे आयोजित करुन वैचारिक जागर घडविला जात आहे.
बाबासाहेबांच्या प्रेरणादायी जीवनचरित्रावर आणि विचारांवर अनेक मान्यवरांनी विविधांगी लेखन केले आहे. गजलसम्राट सुरेश भट यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी व्यक्तीमत्वाला अभिवादन करण्यासाठी लिहिलेली वंदना अत्यंत लोकप्रिय आहे. ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पूर्वेकडील कुंपणभिंतीवर मोठ्या आकारात पूरक छायाचित्रासह आकर्षक रितीने चितारलेली ही वंदना कुणाचेही सहज लक्ष वेधून घेते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनाच्या दुस-याच दिवशी गजलसम्राट सुरेश भट यांची जयंती असून यानिमित्त सेक्टर 15, ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सभागृहात ‘भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना…’ हा गजल आणि कवितांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
सुप्रसिध्द गजलकार अप्पा ठाकूर, डॉ. कैलास गायकवाड, जनार्दन म्हात्रे, मधुकर वारभुवन हे आपल्या गजल व कवितांचे सादरीकरण करणार असून नामांकित गजलकार डॉ. कैलास गायकवाड हे या मैफिलीचे निवेदन करणार आहेत.
तरी काव्य व गजलप्रेमी रसिकांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी जयंतीदिनाच्या उत्तरसंध्येला आणि गजलसम्राट सुरेश भट यांच्या जयंतीदिनी त्यांचे काव्यमय स्मरण करण्यासाठी शनिवार, दि.15 एप्रिल 2023 रोजी, सायं. 6 वा., भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, ऐरोली मुलुंड खाडी पूलाजवळ, सेक्टर 15, ऐरोली, नवी मुंबई येथे मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.