पनवेल दि. 22: रेल्वेच्या तिन्ही उपनगरीय रेल्वे मार्गावर दरवर्षी होणार्‍या अपघाती घटनांमधून बळी जाणार्‍यांची संख्या चिंता करायला लावणारी असते. त्यात नुकतीच ठाणे दरम्यानच्या दिवा-मुंब्रा मार्गावर झालेल्या अपघातात काही प्रवाशांचा बळी जाण्यासह अनेक जण जखमी झाले. या घटनेमुळे रेल्वेतून दैनंदिन प्रवास करणार्‍या प्रवाश्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे.
पनवेल लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे मार्गांवर यंदा जानेवारी ते मे या 5 महिन्यांच्या कालावधीत झालेल्या अपघाती घटनांमधून 29 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 31 जणांना जखमी व्हावे लागले असल्याची माहिती सुत्रांनी दिली. अन्य उपनगरी मार्गाच्या तुलनेत हा मार्ग कमी वर्दळीचा व सुरक्षित समजला जात होता, मात्र हा मार्गही आता गर्दीचा व जिवघेणा ठरत आहे. दरम्यान, रेल्वे पोलिसांकडून विविध प्रकारची जनजागृती केल्यानंतरही बेफिकीरपणाचे दर्शन घडवून शॉर्टकटसाठी जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडण्याची मानसिकता काही केल्या कमी होतांना दिसत नाही. पनवेल लोकल मार्गावर रूळ ओलांडतांना लोकलची ठोकर लागून 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गाडीतून पडून 5 जणांचा, नैसर्गिकरित्या 8 जणांचा अशा एकूण 29 जणांचा मृत्यू झाला आहे. यात तब्बल 28 पुरुष व एक महिला यांचा समावेश आहे. जखमींमध्ये, गाडीतून पडून 17 जण, पाय घसरून 1 व इतर कारणांनी 2 व नैसर्गिक कारणांनी 11 जण असे एकूण 31 जण जखमी झाले आहेत. यात 22 पुरुष व 9 महिला यांचा समावेश आहे. हार्बर मार्गावरील पनवेल लोहमार्ग हद्दीत बेलापूर, खारघर, मानसरोवर, खांदेश्‍वर, पनवेल व मेल मार्गावरील स्थानके अशा स्थानकांचा समावेश आहे. दरम्यान, रेल्वे कायद्यानुसार, एखादी व्यक्ती अनधिकृतपणे रेल्वे रूळ ओलांडतांना पथकांच्या हाती लागल्यास सदर व्यक्तीला एक हजार रूपये दंड किंवा सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास अशा शिक्षेची तरतुद आहे. मात्र त्यानंतरही शॉर्टकट पायी नागरिकांचा बेफिकीरीपणा कमी होत नसल्याने या प्रकारातून बळींची संख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस सर्वत्र वाढतांना दिसत आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!