पनवेल, दि.११ : महानगरपालिका क्षेत्रात 23 ग्रामपंचायत व 29 गावांचे समावेश झालेले आहे. या ग्रामीण भागातील मालमत्तांना महानगरपालिकेने नविन कर आकारणी करून कराची देयके देण्यात आली होती. मात्र महानगरपालिकेने आकारलेला मालमत्ता कर अवाजवी असल्याने तो कमी करण्यात यावा अशी मागणी ग्रामीण भागातील नागरीक, 95 गाव प्रकल्पग्रस्त समिती व स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली होती.त्यानूसार या भागाचे पुर्ननिरीक्षण व करनिर्धारण दुरूस्ती करण्यात आली आहे. नव्या कररचनेमुळे पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्ताधारकांच्या मालमत्ता करात ३०-४० टक्कयांची घट होणार आहे.
आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांनी पूर्वाश्रमीचे ग्रामपंचायत क्षेत्र (निवासी गावठाण क्षेत्र), झोपडपट्टी व दाट वस्ती असलेले क्षेत्र व आदिवासी पाडे, वाड्या व वस्त्या यांचे पुर्ननिरीक्षण करण्याचे आदेश दिले होते.त्यानूसार येथील मालमत्ता कर कमी होण्याच्या दृष्टीने झोन क्र. 3 मधून पुर्वाश्रमी ग्रामपंचायतीच्या गावठाण क्षेत्रातील निवासी मालमत्ता, आदिवासी पाडे, वाड्या व वस्त्या येथील निवासी मालमत्ता या झोन क्र. 4 मध्ये वर्ग करणेत आले आहे तसा सुधारित आदेश मा. आयुक्त यांनी दिनांक १० मार्च रोजी पारित केला आहे. तसेच येथील वार्षिक घनकचरा शुल्क रुपये ६०० मध्ये कपात करून तो रूपये ६० इतका करण्यात आला आहे. या निर्णयाचा ग्रामपंचायत क्षेत्रातील १५ हजार ५०० मालमत्ताधारकांना फायदा होणार आहे.
पनवेल महानगरपालिका स्थापनेपासून प्रथम 2 वर्षे म्हणजे सन २०१६-१७ आणि २०१७-१८ या वर्षाकरिता मालमत्ता कर आकारणी पूर्वाश्रमी ग्रामपंचायतीच्या कराप्रमाणेच राहील. तसेच सुधारित आदेशामुळे पूर्वाश्रमीचे ग्रामपंचायत क्षेत्र (निवासी गावठाण क्षेत्र), झोपडपट्टी व दाट वस्ती असलेले क्षेत्र व आदिवासी पाडे, वाड्या व वस्त्या येथील मालमत्ताधारकांच्या करामध्ये 30 ते 40 टक्क्यांची घट होणार आहे.