पनवेल दि.19: पनवेल प्रभाग समिती अंतर्गत तक्का येथील 2 भंगार दुकाने, पत्राशेड, भिंगारी येथील सोहम हाॅटेल जवळील पत्राशेड, अनधिकृत 7 दुकानगाळे, एपीएमसी मार्केट जवळील 20 शेडवजा गाळे तोडण्यात आले. उरणनाक्यावर 1 शेड अशा सुमारे 40 अनधिकृत बांधकामावर निष्कासन कारवाई करण्यात आली. सदरच्या कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त पनवेल शहर पोलीस स्टेशनने पुरविला. पोलीस उपनिरिक्षक पवार यांचेसह सुमारे 20 पोलीस आणि महानगरपालिकेचे 40 कर्मचारी आजच्या कारवाईत सहभागी झाले होते. आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशान्वये उपायुक्त जमीर लेंगरेकर यांचे मार्गदर्शनाखाली प्रभाग अधिकारी दशरथ भंडारी व सुरेश गांगरे यांनी कारवाई केली. अतिक्रमणाबाबत झिरो टाॅलरन्स या धर्तीवर कोणतेही अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम सहन केले जाणार नाही. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे ही अपेक्षा आहे. अतिक्रमण निष्कासन मोहीम अशीच सातत्याने करण्यात येणार आहे अशी माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी यावेळी दिली.