उलवे ता. ३०: ‘यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था’ शेलघरतर्फे गव्हाण येथे गरीब विद्यार्थ्यांसाठी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ चालवली जाते. ज्या पालकांना आपली मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकायला हवीत असे वाटते, पण लाखो रुपये फी भरण्याची ऐपत नाही, अशा पालकांना दिलासा देण्यासाठी महेंद्रशेठ घरत यांनी सुरू गव्हाण येथे सुरू केलेली न्यू इंग्लिश स्कूल आजघडीला पालकांना वरदान ठरत आहे.
आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या आजोबांनी गरिबांना मदत करण्याची सुरू केलेली परंपरा, महेंद्रशेठ घरत यांनी अखंडितपणे सुरू ठेवलेली आहे. आता आजोबा आणि वडिलांचा वारसा महेंद्रशेठ यांच्या सुकन्या सोनाली घरत-चौधरी चालवत आहेत. सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे, त्यामुळे सोनाली घरत यांनी आजीच्या नावाने सुरू असलेल्या यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलला कॉम्प्युटरचे दान दिले.
सोनाली आणि मयुरेश चौधरी उद्योजक आहेत. सोनाली रिअॅलिटी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या त्या मॅनेजिंग डायरेक्टर आहेत.
त्यांनी आपल्या कंपनीच्या वतीने गुरुवारी (ता. २५) मयुरेश चौधरी यांच्या हस्ते शाळेसाठी दोन कॉम्प्युटर दिले. येत्या काळात एआयचे शिक्षण मुलांना मिळावे, त्यादृष्टीने त्यांनी टाकलेले हे पाऊल आहे. काळानुरूप सक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी सर्व सहकार्य करणार, असे उद्योजक मयुरेश चौधरी यावेळी म्हणाले. तेव्हा विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले.
यावेळी उद्योजक मयुरेश चौधरी म्हणाले, “मी लंडनला उच्च शिक्षण घेतले, पण यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेची शाळा आणि येथील विद्यार्थी, शिक्षक पाहून मी भारावून गेलो. त्यामुळेच ही कॉम्प्युटरची छोटीशी मदत केली. यापुढेही एआय, एअरपोर्ट प्रशिक्षणासाठी कॉम्प्युटरची आणि इतर सर्व प्रकारची मदत केली जाईल.”
जावई मयुरेश चौधरी आणि मुलगी सोनाली यांनी दानाची परंपरा सुरू ठेवल्याने महेंद्रशेठ घरत यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
यावेळी शाळेच्या प्रिन्सिपॉल सपना लाड मॅडम यांनी स्वागत केले, तर योगीता रसाळ यांनी प्रास्ताविक केले. शालेय कमिटीचे पदाधिकारी आणि शिक्षकवृंद यावेळी उपस्थित होता.