माथेरान दि.14 (मुकुंद रांजणे) उन्हाळ्यात ऐन गर्दीच्या काळात अनेकांना माथेरानला भेट देणे अशक्य असते अशी मंडळी हमखासकरून पावसाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात एक दोन दिवस आपल्या नोकरी धंद्यातून वेळ काढून कामातील क्षीण अन थकवा दूर करण्यासाठी जवळचे पर्यटनस्थळ म्हणून माथेरानला पसंती देतात. त्यासाठी आपल्या मुलाबाळांना, घरातील वयस्कर मंडळींना सोबत घेऊन लवाजम्यासह येत असतात. परंतु येथील मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या दस्तुरी नाक्यावर पार्किंग साठी जागा उपलब्ध नसल्याने घाटरस्त्यात मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने तासनतास पर्यटकांना मोटार गाडीतच अडकून राहावे लागत आहे. त्यातच पावसाळ्यात हा केवळ सात किलोमीटरचा वीस मिनिटांचा प्रवास वाहतूक कोंडीमुळे वेळप्रसंगी तीन ते चार तासाचा बनला आहे. त्यामुळे या मार्गावर प्रशासन या वाहतूक कोंडीचे दुष्टचक्र केव्हा दूर करणार या विवंचनेत पर्यटक दिसत आहेत. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या माथेरान मध्ये सद्यस्थितीत दस्तुरी नाक्यापासून ते माथेरान रेल्वे स्टेशन पर्यंत ई रिक्षाची महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध झाल्यामुळे खऱ्या अर्थाने पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसत आहे हे नाकारताच येत नाही. आबालवृद्ध पर्यटकांना याच माध्यमातून सोयीस्कर आणि सुरक्षित प्रवास करणे अगदी सहज शक्य झाले आहे त्यामुळेच वयस्कर मंडळी सुध्दा आवर्जून इकडे यायला उत्सुक दिसत आहेत.
अनेक वर्षांपासून दस्तुरी पार्किंग येथील एमपी ९३ हा प्लॉट रिक्त असून तो अद्यापही नगरपरिषदेच्या अखत्यारीत आलेला नाही. हा प्लॉट उपलब्ध होण्यासाठी खऱ्या अर्थाने तालुक्यातील, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीनी राज्य शासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करून पार्किंग साठी उपलब्ध करून दिल्यास पार्किंगची समस्या कायमस्वरूपी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे साहजिकच आजतागायत होत असणारी नेरळ माथेरान घाटरस्त्यातील वाहतूक कोंडी आपसूकच दूर होणार आहे. याकामी स्थानिक पातळीवरील आणि तालुक्यातील लोकप्रतिनिधीनी राजकीय श्रेयवाद बाजूला सारून व्होट बँकेचा विचार न करता एकोप्याने हा प्रश्न मार्गी लागू शकतो असे स्थानिक बोलत आहेत.
————————————
आम्ही शनिवारी दुपारच्या दरम्यान माथेरानला आलो होतो परंतु घाटात ट्रॅफिक जाम झाले होते. त्यामुळे आमची गाडी वॉटर पाईप रेल्वे स्टेशन जवळील चढावाच्या ठिकाणी उभी केली होती. मुंगीच्या चालीने सर्व गाड्या वर वर जात होत्या. त्यामुळे आमची चांगलीच पंचाईत झाली. अखेर आम्ही चार वाजता दस्तुरी नाक्यावर आलो तेथील पार्किंग भागातील जंगलात आमची गाडी पार्क करून ई रिक्षाच्या साहाय्याने गावात पोहोचलो. आमची एवढीच इच्छा आहे की शासनाने याठिकाणी सुसज्ज अशी पार्किंगची व्यवस्था करावी जेणेकरून वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार नाही.
इम्तियाज पटेल –पर्यटक मुंबई
—————————————————–
आम्ही आजवर अनेक ठिकाणी पाहिले आहेत की पर्यटनस्थळावर जाण्यासाठी अन्य पर्यायी व्यवस्था असते परंतु माथेरान मध्ये येण्यासाठी नेरळ ते माथेरान हाच मार्ग असल्याने या घाटात सुट्ट्यांच्या हंगामात खूपच गर्दी होते. सुट्टीच्या एकाच दिवशी मुंबईचे लोक फिरायला निघतात. पण सर्वानाच इथे होणाऱ्या ट्रॅफिक मुळे जिकिरीचे बनले आहे. सरकारने इथे सुध्दा काहीतरी पर्यायी व्यवस्था केली पाहिजे.
कौशल्य त्रिपाठी —पर्यटक मुंबई
———————————————-
वाढत्या ऐन पर्यटन हंगामात वाहनांची गर्दी होऊन रस्ता जाम होतो. यासाठी अपुऱ्या पार्किंगची व्यवस्था, चालकाचा बेशिस्तपणा, आणि प्रशासन करीत असलेले नियोजन कुठे तरी पुरते फसते. याचा परिणाम पर्यटकांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. तर पर्यटक माघारी जात असल्याने स्थानिकांच्या व्यवसायावर परिणाम होतो. यासाठी या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने नागरिकामधून सूचना मागवून त्यांची पूर्तता करावी.
शिवाजी शिंदे –माजी विरोधी पक्षनेते माथेरान नगरपालिका
—————————————–

✅ अपडेट्ससाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करण्याकरिता 🔗 https://chat.whatsapp.com/DYEmwOQwmkxCTLwVPLNkkL

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!