पनवेल दि.५: तळोजा येथील रेल्वे फाटकाजवळील भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याच्या मागणीसाठी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला यश आले असून, चाचणीच्या स्वरूपात एक लेनची वाहतूक सुरू करण्यात आली आहे तसेच येत्या सोमवारपासूनसंपूर्ण भुयारी मार्ग सुरू करणार असल्याचे आश्वासन सिडको अधिकार्यांनी दिले आहे.
तळोजा रेल्वे फाटकाजवळ वाहनचालकांना नेहमी प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. दिवा-पनवेल मार्गावर अनेक वेळा एकामागोमाग दोन ते तीन रेल्वेगाड्या मार्गक्रमण करीत असल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागत असतात. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी भुयारी मार्ग उभारण्यात आला असून, त्यानंतर उद्भवलेल्या समस्यांसंदर्भात दुरुस्तीचे कामही पूर्ण झाले, पण प्रचंड वाहतूक कोंडी होऊनसुद्धा हा भुयारी मार्ग अधिकार्यांकडून वाहतुकीसाठी खुला केला जात नव्हता. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जन आंदोलनाद्वारे बॅरिकेड्स हटवून हा मार्ग खुला करण्याचा इशारा नगरसेवक हरेश केणी तसेच प्रल्हाद केणी, निर्दोश केणी, दिनेश केणी आणि विविध संघटनांनी दिला होता, मात्र मुजोर अधिकार्यांनी याबाबत कार्यवाही न केल्याने आज आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, पनवेल महापालिकेचे उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, प्रभाग समिती ‘अ’च्या सभापती अनिता पाटील, नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, शत्रुघ्न काकडे, प्रवीण पाटील, निलेश बावीस्कर, भाजप नेते निर्दोश केणी, नारायणबुवा पाटील, संतोष पाटील यांच्यासह गौरा गणपती महिला मंडळच्या सदस्य आणि पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आंदोलनाच्या दणक्याने सिडको अधिकार्यांनी नमते घेत चाचणीच्या स्वरूपात एक लेनची वाहतूक सुरू केली असून, संपूर्ण भुयारी मार्ग येत्या सोमवारपासून सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले. अधिकार्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही, तर आम्ही पलीकडे रेल्वेच्या ट्रॅकवर जाऊन बसू, असा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला आहे.