दिल्ली दि.13: केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री नामदार कपिल पाटील यांच्यासोबत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना भेटलेले शिष्टमंडळाशी चर्चा करताना विमानतळाचे काम अद्याप पूर्ण होण्यास अवकाश असल्याने सिडको नामकरणाची घाई का करत आहे, असा सवाल नामदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज दिल्ली येथे शिष्टमंडळाच्या बैठकीत केला.
लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने दिल्लीत नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री नामदार कपिल पाटील यांची भेट घेतली समितीने त्यांचे अभिनंदन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी विषयी आभार व्यक्त केले.या भेटीत विमानतळाच्या नामकरणाबाबत चर्चा करण्यात आली.
नामदार कपिल पाटील यांच्यासमवेत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची त्यांच्या दालनात भेट घेण्यात आली. नामदार सिंधिया यांनी शिष्टमंडळाचे निवेदन स्विकारुन अध्यक्ष दशरथ पाटील व समितीचे म्हणणे ऐकून घेतले. याविषयी बोलताना नामदार जोतिरादित्य सिंधिया यांनी केंद्र सरकार नेहमी भूमिपुत्रांच्या सोबत असल्याचे सांगून अद्याप विमानतळाचे काम पूर्ण झाले नसल्याचे सांगितले. तसेच सिडको नामकरणाची घाई का करीत आहे असा सवालही त्यांनी याप्रसंगी उपस्थित केला, त्याचबरोबर भूमिपुत्रांच्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले. याप्रसंगी केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री कपिल पाटील, यांच्या सोबत शिष्टमंडळात कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, उपमहापौर जगदिश गायकवाड, जे. डी. तांडेल, संतोष केणे, गुलाब वझे, राजेश गायकर, दीपक पाटील, संतोष घरत, विनोद म्हात्रे, नंदेश ठाकूर, गोपीनाथ म्हात्रे आदी उपस्थित होते.