अलिबाग दि.29: गेली दोन महिन्यापासून सर्वांचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर झाला. यात रायगड जिल्ह्याचा निकाल 96.07 टक्के लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 19.29 टक्क्याने निकाल वाढला आहे. मुलांपेक्षा मुलींचा निकाल अडीच दहा टक्क्याने जास्त आहे. 80.41 टक्के निकाल लावून माणगाव तालुक्याने जिल्ह्यात बाजी मारली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील 551 शाळांपैकी 235 शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च महिन्यात इयत्ता दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल बुधवारी मंडळाच्या संकेतस्थळांवर दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आला. दहावीच्या परीक्षेसाठी रायगड जिल्ह्यातून 35 हजार 326 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी 35 हजार 160 विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. यामधील 33 हजार 778 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, 1 हजार 382 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 96.07 टक्के इतके आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त निकाल 97.28 टक्के पनवेल व महाड तालुक्यांचा लागला असून, सर्वात कमी 93.04 टक्के निकाल खालापूर तालुक्याचा लागला आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा निकाल नव्वद टक्केच्या वर आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत 19.29 टक्क्यांनी दहावी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील 76.78 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. तर चालू वर्षात 96.07 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
रायगड जिल्ह्यातील 33 हजार 778 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यामध्ये 10 हजार 428 विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. 13 हजार 290 विद्यार्थी पहिल्या श्रेणीत, तर 8 हजार 40 विद्यार्थी व्दितीय श्रेणी, 2 हजार 20 विद्यार्थी पास श्रेणीणे उत्तीर्ण झाले आहेत.
रायगड जिल्ह्यातील 5 हजार 140 पुनर्परीक्षार्थी अर्ज दाखल केले होते. यामधील 5 हजार 55 विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. त्यापैकी 4 हजार 20 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, 1 हजार 35 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. पुनर्परीक्षार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 79.53 टक्के इतके आहे.
अलिबाग तालुक्यातील आर.सी.एफ. हायस्कूलची विद्यार्थिनी प्रणवी बसंत सिंग हिने 100 टक्के गुण मिळविले.
ऑनलाईन निकाल लागल्यानंतर दुसर्‍या दिवसापासून विद्यार्थ्याना अनिवार्य विषयांची गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन अर्ज करता येईल. यासाठी http://verification.mh-ssc.ac.in या वेबसाईटवर अथवा शाळेमार्फत अर्ज करता येऊ शकेल. गुणपडताळणीसाठी 30 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान अर्ज करता करता येणार आहे. तसेच छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदतही 30 जुलै ते 18 ऑगस्ट आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!