नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे तसेच प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत यासाठी दिबांच्या स्मृतिदिनी अर्थात २४ जूनला सिडकोला केले जाणार घेराव आंदोलन
पनवेल दि.२२ (हरेश साठे) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे तसेच प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत यासाठी दिबासाहेबांच्या स्मृतिदिनी अर्थात २४ जूनला सिडकोला घेराव आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आज पनवेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने देण्यात आली.
शहरातील आगरी समाज सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सहचिटणीस संतोष केणे, खजिनदार जे. डी. तांडेल यांनी पत्रकारांना आंदोलनासंदर्भात माहिती दिली. यावेळी विजय गायकर व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी मागील आंदोलनाची पार्श्वभूमी सांगतानाच दिबांचेच नाव विमानतळाला लागेपर्यंत व भूमिपुत्रांच्या विविध मागण्या पूर्ण होईपर्यँत हा लढा कायम राहणार असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्त भूमिपूत्रांनी मागील वर्षी १० जूनला भव्य साखळी आंदोलन, २४ जूनला ऐतिहासिक सिडको घेराव आंदोलन, ९ ऑगस्ट क्रांतिदिनी मशाल मोर्चा, १७ मार्च भुमिपुत्र परिषद, सिडको वर्धापन दिनाचा काळादिन आंदोलन, २४ जानेवारीचे विमानतळ काम बंद आंदोलन अशी भव्य आंदोलने केली. पण सिडको आणि महाराष्ट्र सरकार प्रकल्पग्रस्त भूमिपूत्रांच्या या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आली आहे. त्यामुळे येथील भूमिपूत्रांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मागील २४ जुनच्या सिडको घेराव आंदोलनात सिडकोकडे विमानतळाच्या पूर्वीचा नामकरणाचा ठराव विखंडित करून लोकनेते दि बा पाटील यांच्या नावाचा ठराव करावा असे निवेदन दिले होते मात्र वर्ष उलटले तरी त्यावर सिडको अथवा शासनाने कोणताही निर्णय केलेला नाही. सुदैवाने भूमिपुत्रांच्या एकीमुळे बाळासाहेबांच्या नावाचा ठराव अद्याप मंत्री मंडळाच्या बैठकीत अथवा विधानसभेत आणला गेला नाही.
सिडको आणि त्या अनुषंगाने राज्य सरकारने नवी मुंबई वसवताना सरकारने रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि ठाणे जिल्ह्यातील बेलापूर पट्टीतील ९५ गावातील ६५ हजार शेतकर्यांच्या कुटुंबाच्या पिकत्या जमिनी कवडीमोल भावाने संपादीत केल्या आणि आज त्यावर सिडकोने हजारो कोटी कमवले आहेत. पण १०० टक्के भूमिहीन केलेल्या प्रकल्पग्रस्तांना काही द्यायचे झाले की, सिडको उदासिन दिसते. म्हणूनच प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या अनेक मागण्या आजही प्रलंबित असल्याचे दिसत आहे. प्रकल्पग्रस्तांचे शिक्षण, नोकरी, साडेबारा टक्के भूखंड, गरजेपोटी बांधलेली बांधकामे, गावठाण विस्तार, विमानतळबाधीत २७ गावाच्या समस्या, नैना प्रकल्पाच्या समस्या असे अनेक प्रश्न सिडकोच्या उदासिन वृत्तीमुळे प्रलंबित आहेत. यापूर्वी सिडकोत अनेक ठराव होऊनही प्रकल्पग्रस्तांचे गरजेपोटीची बांधकामे नियमित केली जात नाहीत. यासाठी नुकताच केलेल्या शासन निर्णयात २५० मीटरचे निकष, भाडेपट्टा अश्या अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी आहेत. सिडकोच्या या भूमिकेचा निषेध करण्यासाठी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या ९ व्या स्मृतिदिनी म्हणजे २४ जून २०२२ रोजी सकाळी ११ वाजता सिडको घेराव आंदोलन करण्यात येणार असल्याचे कृती समितीच्यावतीने सांगतानाच या आंदोलनात भूमिपुत्रांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या आहेत मागण्या…
२८ एप्रिल २०२१ रोजी नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावाबाबत सिडकोने केलेला ठराव विखंडीत करून प्रकल्पग्रस्त भूमिपूत्रांच्या भावना लक्षात घेऊन लोकनेते दि.बा.पाटील यांच्या नावाचा नवीन ठराव सिडकोने करावा., जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना विनाविलंब साडेबारा टक्के भूखंडाचे वाटप करावे., दि. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी सरकारने काढलेला, नवी मुंबईतील, गरजेपोटी बांधलेल्या बांधकामांबाबतच्या शासन निर्णयामध्ये प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेऊन बदल करण्यात यावेत., विमानतळबाधीत २७ गावांच्या समस्या त्वरेने सोडवाव्यात., प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न बैठका घेऊन तातडीने सोडवले जावेत.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!