मुंबई दि.११: मराठी समीक्षेत मोलाचा वाटा असणारे ज्येष्ठ समीक्षक प्रा. गंगाधर पाटील (वय ९३) यांचे अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. प्रा. गंगाधर पाटील यांनी पाश्चात्त्य साहित्य विचार व समीक्षा मराठीत आणली.
प्रा डॉ गंगाधर पाटील यांचे मुळ गाव अलिबाग तालुक्यातील खिडकी हे आहे. तेथे त्यांची वडिलोपार्जित शेती वाडी आहे. खिडकी परिसरात तिनवीरा येथे लोक शिक्षण मंडळाची स्थापना करून तेथे माध्यमिक शाळा सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता, या शाळेचे माजी मुख्याध्यापक आणि सामाजिक कार्यकर्ते स्व वासुदेव पाटील यांचे ते वडील बंधू आहेत तर खिडकीचे माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते आल्हाद पाटील व वैभव पाटील यांचे ते मोठे काका आहेत. त्यांच्या अकस्मात निधनाने पाटील कुटुंबीयांवर आणि संपूर्ण खिडकी गावावर शोककळा पसरली आहे.
पाटील सरांनी भारतीय आणि पाश्चात्त्य ज्ञानदृष्टींच्या आधारे आदर्शवत समीक्षा कशी आकार घेऊ शकते ते त्यांच्या लेखनातून सिद्ध करून दाखवले. मराठी नवसमीक्षेचे ते खरेखुरे नायक होते.
