मुंबई दि.10: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात उल्लेखनीय बदल झाले असून, रविवार आणि सोमवारसाठी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सोमवारी मुंबईसह संपूर्ण कोकण परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये, असेही आवाहन भारतीय हवामान शास्त्र विभागाने केले आहे.
11 ऑक्टोबरला विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोव्यात, तर 12 ऑक्टोबर रोजी विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. 13 ऑक्टोबर रोजी विदर्भ, मराठवाडा, कोकण, गोव्यात मुसळधार पाऊस पडेल. 14 ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोव्यात मुसळधार पाऊस पडेल. या वेळी ताशी 70 किमी वेगाने वारे वाहतील. शिवाय समुद्र खवळलेला राहील. परिणामी मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
दरम्यान, भारतीय हवामान शास्त्र विभागाने ऑरेंज अलर्ट दिला असताना शनिवारी सकाळी मुंबईत आकाश स्वच्छ होते, मात्र दुपारनंतर मुंबई शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणावर पावसाचे ढग दाटून गडगडाट सुरू झाला. मुंबईत बहुतांश ठिकाणी पावसाची हजेरी लावली. या वेळी लगतच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर ढगांचा गडगडाट सुरू होता.