भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष
विरोधकांमध्ये सन्नाटा
कळंबोली दि.२३ (दीपक घोसाळकर) विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीने भाऊबीज चे दान देऊन अन आपल्या पंधरा वर्षाच्या विकसनशील समाजपयोगी कार्यामुळे प्रेरित झालेल्या मतदारांनी घवघवीत मतदान करून पनवेल विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा प्रशांत रामशेठ ठाकूर यांना १,८३,९३१ मतांनी विजयी करून ५१,०९१ चे मताधिक्य देवून निवडून दिले आहे. निवडणुकीचा निकाल हा सकाळपासून लागतच होता. पनवेल मधील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष होत होता. एकच वादा प्रशांत दादा, आयेगा तो ठसके प्रशांत दादाच आयेगा, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. निवडणुकीच्या निकाला दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पूर्ण खबरदारी पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी घेतली होती. विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांना आमने-सामने येऊ न देण्याची खबरदारी ही चांगल्या पद्धतीने घेतल्याने पनवेल विधानसभा निकाला दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या निकाला दरम्यान मनमुराद आनंद लुटला. मात्र अखेरीस लागलेल्या निकालानंतर विरोधकांचा सुपडा साफ झाल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून फटाक्याची आतषबाजी करत एकच जल्लोष केला. या जल्लोषामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांचे पुत्र अपूर्व प्रशांत ठाकूर हे मोठ्या हिरीरीने सहभागी झाले होते.
पनवेल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी खांदा कॉलनी जवळील कळसेकर अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये करण्यात आली. या ठिकाणी मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला होता. शनिवारी सकाळपासून सुरू झालेल्या मतमोजणीच्या पहिल्या काही फेरीमध्ये अपक्ष उमेदवार बाळाराम पाटील यांनी चांगल्या मतांची आघाडी घेतली होती. त्यामुळे शेकाप कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र टप्प्या टप्प्याने मतमोजणीच्या फेऱ्या वाढत गेल्या तस तसे बाळाराम पाटील यांचे मताधिक्य कमी होऊन भाजपाचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी आघाडी घेतली. पाचव्या सहाव्या फेरीनंतर त्यांनी घेतलेली मतांची आघाडी ही कायम २६ व्या फेरीपर्यंत टिकून राहिली. १५ व्या फेरीनंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करण्यास सुरुवात केला. विविध राजकीय गाण्यांच्या ठेक्यावर हजारो कार्यकर्त्यांनी ठेका धरून एकच जल्लोष केला. भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलीस प्रशासनाकडून महापालिकेचे होत असलेल्या नवीन स्वराज्य इमारती जवळील मोकळ्या जागेस थांबण्यास परवानगी दिली होती. या मोकळ्या जागेमध्ये घोषणां सोबतच मोठ्या प्रमाणावर फटाक्याची व गुलालाची उधळण होत होती. महिला अबाल ,वृद्ध ,तरुण कार्यकर्ते हे प्रशांत ठाकूर आगे बढो हम तुम्हारे साथ है ,च्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडत होते. भाजपचा झेंडा आसमतात भिरकावून एक जल्लोषाचे वातावरण या ठिकाणी निर्माण करत होते. या परिसरात हजारो कार्यकर्ते जमल्याने आजूबाजूच्या भागात वाहनांची पार्किंग करण्यात आली होती. रस्त्यावर वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पनवेल पोलीस वाहतूक शाखेने ही चांगला बंदोबस्त तैनात केला होता. या निवडणूक निकाला दरम्यान जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या दिमतीसाठी एका मंडपाची ही सोय करण्यात आली होती. आजूबाजूच्या परिसरात रसवाले ,फळ विक्रेते, वडापाव विक्रेत्यांनी ही आपली दुकाने थाटून आपलाही व्यवसाय सकाळपासून ते सायंकाळपर्यंत करून घेतला. जसजसे मतमोजणीच्या फेरी वाढत होत्या मतांची टक्केवारी वाढत होती तसतसा भाजपा कार्यकर्त्यांमधील जल्लोष हा शिगेला पोहोचत होता. याच जल्लोषांमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांचे छोटे पुत्र अपूर्व प्रशांत ठाकूर हेही आपल्या कार्यकर्त्यांसह जल्लोषात सहभागी झाले होते .सजवलेल्या उघड्या मोटारीच्या वर बसून ते मनमुराद आनंद लुटत होते. आपले वडील निश्चितच चौकार मारणार अशा विश्वासाच्या चौकाराचे हात दाखवत ते कार्यकर्त्यांनाही उत्साहित करीत होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आमदारकीच्या चौकाराने प्रभावित होऊन भाजप कार्यकर्ते मोठ्या जल्लोषात आपला आनंद व्यक्त करत होते.
कमळ निशाणी असलेले झेंडे भाजपाचे कार्यकर्ते जल्लोषात फडकवत होते. याच दरम्यान आपला आपला उत्साह आणि आमदारांनी चौकार मारल्याचा आनंद शिट्टी वाजवून व्यक्त करत होते .भाजपाचे कमळ जरी जिंकले असले तरी विरोधी असणाऱ्या अपक्ष उमेदवार बाळाराम पाटील यांची असलेली शिट्टी निशाणी चा गजर करून परिसर दणाणून सोडला होता. त्यामुळे जरी विजय कमळाचा झाला तरी गजर हा जल्लोषामध्ये शीट्टीचा होत होता हे दिसून आले. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह जल्लोष आणि आनंदाचे वातावरण यामुळे निर्माण होते. काही कार्यकर्ते उत्साहाने म्हणत होते की आम्हीच अखेर शिट्टी वाजवली. त्यामुळे कळशेकर महाविद्यालयाच्या बाहेर जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या हातात शिट्टी घेऊन गजर होत असल्याने एक सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले जात होते. काहींनी शीट्टी हवेतही भिरकावून दिली, तर काहींनी मुखात घेऊन शीट्टीचा गजर केला आणि अखेर आम्ही वाजवली ना शिट्टी अशा जल्लोषात कार्यकर्ते बोलून आपला आनंद व्यक्त करत होते.
पनवेल विधानसभा मतमोजणीच्या निकालादरम्यान हजारो कार्यकर्ते हे पनवेल महापालिकेचे प्रस्तावित असलेल्या स्वराज्य महापालिकेच्या निर्माणनीत इमारतीच्या मोकळ्या जागेत मोठ्या संख्येने जमले होते. या जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांमध्ये एका उघड्या सजवलेल्या भाजपचे कमळ निशाणी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे भाजपाचे अध्यक्ष जे.पी नड्डा,देवेंद्र फडणवीस यांचा फोटो ने रंगबिरंगी सजलेली उघडा गाडीवरती कार्यकर्त्यांसमवेत आमदार प्रशांत ठाकूर यांचे छोटे पुत्र अपूर्व प्रशांत ठाकूर मोठ्या उत्साहात पूर्ण वातावरणात सहभागी झाले होते. निकाल लागायच्या अगोदरच त्यांनी आपली गाडी वर आपले आजोबा लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे चित्र लावून एकटाच बॉस असे लिहून आपला आदर व्यक्त केला होता. तसेच गाडीच्या काचेवर घासून नाय ठासून आलाय आमचा दादा असे लिहिलेले स्टिकर लावले होते. त्यामुळे निकाला अगोदरच ठासून येण्याचा विश्वास हा त्यांनी व्यक्त केला होता. गाडीवर बसून भाजपाचा भला मोठा झेंडा घेऊन ते हवेत डौलदारपणे फिरवत होते. त्यातच हातात धरून फटाक्याची आतषबाजी ही करत होते. चौकारीचा निशाणा दाखवून कार्यकर्त्यांमध्ये जल्लोशही भरत होते. यावेळी त्यांना विचारले असता ते म्हणले की खूप आनंद होत आहे की आमचे पप्पा चौथ्यांदा आमदार होत आहेत. त्यांनी केलेल्या पंधरा वर्षाच्या मोठ्या कामगिरीमुळे त्यांना मतदारांनी निवडून दिले आहे. पुढल्या पाच वर्षांमध्ये ही ते आपली कामे दमदारपणे निश्चितच करणार आहेत असे त्यांनी सांगितले. यावेळी गुलालाची उधळणही मोठ्या प्रमाणावर केली जात होते.
निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर पनवेल मधील सर्व सर्व पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते याची संयुक्त बैठक पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी घेतली होती. त्यावेळी निवडणुकीच्या निकाला दरम्यान कोणतेही पक्ष आमने सामने येऊ नयेत यासाठी त्यांनी कुठे उभे राहावे याची व्यवस्था व सूचना त्यांनी यावेळी दिल्या यामध्ये बीजेपी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे ठाणा नाका बाजूस थांबतील व वाहन हे पुढील सर्विस रोडवर पार्क करतील. शेकाप पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे ब्रांचस स्कूल रोडने कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीत प्रवेश करतील व कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी मेन गेटच्या आतील बाजूस थांबतील. शिवसेना उबाठा पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे जेएनपीटी सर्विस रोडवर वाहन पार्क करतील व तेथून पुढे सर्विस रोडने बॅरिकेट जवळ थांबतील. मनसे पक्ष व इतर पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे साईनगर येथील सर्विस रोडने पुढे येऊन वाहन पार्क करून आरटीओ पासिंग ठिकाणी थांबतील असे सांगण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी योग्य नियोजन केल्याने निकालाच्या दरम्यान कोणताच अनुचित प्रकार न होता मतमोजणी ही शांततेत व निवडणुकीचा निकाल ही जल्लोषात आणि शांततेमध्ये व्यक्त करण्यात आला.
