पनवेल दि.१५ : ऑनलाईन फ्राड झाल्यास लवकरात लवकर संबंधिताने पोलिस ठाण्यात तक्रार करावी, जेवढी लवकर तक्रार दाखल होईल तेवढे नुकसान कमी होईल, आजच्या काळात जवळचा शत्रू आणि मित्रही मोबाईलच आहे असे सांगताना ज्येष्ठ नागरिकांनी मोबाईलचा वापर जपून करावा असे आवाहन आयपीएस डॉ. बाळसिंग राजपूत यांनी केले.
पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके सभागृह येथे करण्यात आले होते. यावेळी ‘सायबर सुरक्षा’ या विषयावर ते बोलत होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त स्वरूप खारगे, उपायुक्त अभिषेक पराडकर, उपायुक्त मंगल माळवे, सचिव अक्षय कदम, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ.राजू पाटोदकर उपस्थित होते.
यावेळी राजपुत यांनी ,ज्येष्ठ नागरिकांना सायबर गुन्ह्याचे विविध प्रकार सांगून सतर्कता बाळगण्याबाबत मार्गदर्शन केले. फोनचा वापर सतर्कतेने करताना वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याविषयी सूचना दिल्या.
‘ज्येष्ठ नागरिकांसमवेत कृतज्ञता संवाद’ कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10:30 वाजता आरोग्य तपासणी शिबिराने करण्यात आली. महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त यांनी महेशकुमार मेघमाळे यांनी या शिबिराचे उदघाटन केले.
दुपारच्या सत्रात जेष्ठ नागरिकांच्या हक्कांविषयी माहिती देताना ॲड.श्रीनिवास क्षीरसागर यांनी संविधान, मार्गदर्शक तत्त्वे तसेच जेष्ठ नागरिकत्व कायदा, ज्येष्ठांच्या मूलभूत गरजा, जेष्ठ नागरिकांचे हक्क, त्यांच्या समस्या, त्यावरील उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले.
ज्येष्ठांचे विविध गुणदर्शन कार्यक्रमात विविध कलांचे सादरीकरण
ज्येष्ठ मंडळीच्या सुप्त कला-गुणांना वाव देण्यासाठी त्यांना हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी, त्यांनीच बसवलेले विविध गुणदर्शन कार्यक्रम यावेळी करण्यात आले. यात नाटक, गीत, मिमिक्री, नक्कल, काव्यवाचन, एकपात्री अभिनय, अशा कला ज्येष्ठ नागरिक मंडळींनी सादर केल्या. याचबरोबर संगीत रजनीचेही आयोजन करण्यात आले होते. सुरेल मैफिलीचा आस्वाद नागरिकांनी यावेळी घेतला.
यावेळी झालेल्या आरोग्य शिबिरांमध्ये विविध आरोग्य सेवांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते.
- नागरिकांची आरोग्य तपासणी :
● उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या निदान
● हिमोग्लोबीन तपासणी
● साखर तपासणी
● प्लेटलेट तपासणी
● नेत्र तपासणी
● ईसीजी
● मानसिक आरोग्य तपासणी
● हाडांचे डॉक्टर
● एक्स रे - नोंदणी आणि कार्ड वाटप :
● आयुष्यमान भारत डिजीटल मिशन कार्ड (ABDM), पंतप्रधान जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत नोंदणी व आयुष्यमान वय वंदना कार्ड वाटप सर्व गरजू व पात्र लाभार्थ्यांना करण्यात आले.
