कळंबोली दि.९ : पवित्र पोर्टल मधून नियुक्त झालेल्या नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण के.आ. बांठीया ज्युनिअर कॉलेज,नवीन पनवेल येथे सुरू झाले. सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना सेवेतील कर्तव्ये, जबाबदाऱ्या, नवीन उपक्रम, शासकीय योजना, नवीन अध्ययन अध्यापन पद्धती, शिक्षणातील नावीन्य, विविध शासन निर्णय, शिक्षणातील तंत्रज्ञानाचा उपयोग या अशा अनेक गोष्टींचे ज्ञान व्हावे व शिक्षकांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होऊन प्रेरणा मिळावी अशा अनेक उद्देशाने प्रशिक्षण ४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर असे एकूण सात दिवसांचे नियोजन करण्यात आले आहे.
पनवेल केंद्रावरती कर्जत, खालापूर, पेण, उरण, पनवेल या पाच तालुक्यातील नवनियुक्त शिक्षक प्रशिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषद, नगरपालिका, खाजगी संस्थांमधील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरातील शिक्षक प्रशिक्षणार्थी सहभागी आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे यांच्यातर्फे आयोजित केलेल्या प्रशिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता प्रशिक्षण समन्वयक रामदास टोणे करत आहेत.
नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण पनवेल केंद्रावर सुरू असून २२५ प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. व १६ तज्ञ सुलभक यांच्या द्वारे प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणामधून शिक्षकांना सकारात्मक दृष्टीकोन मिळेल, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. सद्य:स्थितीतील योजना, उपक्रम समजतील. विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी उंचावण्यास मदत होईल. विविध मानके, सेवाशर्ती व नियमावली, समित्या, अद्ययावत मूल्यमापन साधने व तंत्रे याबाबत माहिती मिळण्यास मदत होईल. या प्रशिक्षणास डाएट चे प्राचार्य डॉ.आय.ए.इनामदार, शिक्षणाधिकारी पुंनीता गुरव, शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, प्राचार्य भगवान माळी,संतोष दौंड,सागर तुपे यांनी भेट दिली. गटाचे कुलप्रमुख म्हणून सुभाष राठोड,संजय पाटील, राकेश अहिरे व सोनल गावंड तज्ञ सुलभक म्हणून काम पाहत आहेत.तसेच प्रशिक्षण व्यवस्थापन साधनव्यक्ती चेतन गायकवाड करत आहेत.