प्रकल्पग्रस्त समितीचे काम योग्य दिशेने खोडा घालण्याचा प्रयत्न करू नये – लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सल्ला

पनवेल दि.३०: दिबासाहेब प्रकल्पग्रस्त स्थानिकांचे दैवत आहेत. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या भावनेतून गेल्या अनेक वर्षांपासून सर्वपक्षीय लढा उभारण्यात आला आहे. लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गेल्या पाच वर्षांत असंख्य आंदोलने, मोर्चे, शेकडो बैठका पार पडल्या आहेत. रायगड, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, डोंबिवली अशा विविध ठिकाणांहून लाखो भूमिपुत्रांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. या लढ्याला जनतेचा व्यापक पाठिंबा असताना अचानक खासदार सुरेश उर्फ बाळयामामा म्हात्रे यांची घुसखोरी सुरू झाली आहे. “हा लढा सुरू असताना बाळयामामा म्हात्रे कुठे होते?” असा सवाल उपस्थित करून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.”सुरेश म्हात्रे आमच्या विभागाचे खासदारच नाहीत, त्यामुळे त्यांना या लढ्याचे महत्व व इतिहास माहित नाही. फक्त श्रेय घेण्यासाठी आणि शो शायनिंगसाठी ते पुढे येत आहेत, अशी रोखठोक प्रतिक्रिया लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
प्रकल्पग्रस्त आणि समितीला विश्वासात न घेता स्वतःच्या मनमर्जीने खासदार बाळयामामा म्हात्रे दिखाऊगिरी व दिशाभूलसाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेत दिबासाहेबांचेच नाव मिळाला पाहिजे हि आमची आग्रही भूमिका आहे आणि त्यासाठी समिती दक्ष असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेला त्यांच्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी म्हंटले कि, सुरेश म्हात्रे यांनी ०६ ऑक्टोबरला मोर्चा काढण्याची घोषणा केली असली तरी त्या संदर्भातील बैठकीला लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचा कुणीही पदाधिकारी उपस्थित नव्हता. विशेष म्हणजे, त्या बैठकीला मी उपस्थित नसतानाही माझ्या नावाचा उल्लेख वर्तमानपत्रात करण्यात आला. या पार्श्वभूमीवर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “भूमिपुत्रांना फसविण्याचा केविलवाणा प्रयत्न होऊ नये. समितीच्या बाहेरून अशा हालचाली होणे दुर्दैवी आहे. ०३ ऑक्टोबर रोजी नवी मुंबईत समितीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीतच पुढील वाटचालीचा निर्णय घेतला जाणार आहे. “समितीचा एकमुखी निर्णय हाच आमचा मार्ग असेल आणि भूमिपुत्रांच्या इच्छेनुसारच आम्ही पुढे पाऊल टाकू,” असेही त्यांनी अधोरेखित केले. नवी मुंबईत होत असलेल्या विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट हे नाव द्यावे याकरिता लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीची स्थापना करण्यात आली. आणि हि समिती सन २०२० पासून दिबांच्या नावासाठी सतत प्रयत्नशील आहे. या समितीमध्ये सर्वपक्षीय नेते मंडळींचा समावेश आहे. या समितीच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात अनेक आंदोलने करण्यात आली. भव्य मानवी साखळी आंदोलन, एक लाख भूमीपुत्राचा सिडको घेराव आंदोलन, गावागावात मशाल मोर्चे, भूमिपुत्र परिषद, गावोगावी बैठका आणि त्यामधून जनजागृती असा लढा उभारण्यात आला. एकंदरीत पाच वर्षात शंभरहून अधिक बैठका होऊन आम्ही हे सर्व मार्गी लावले आहे. त्यामधून आम्हाला मोठ्या स्तरावर दिबांच्या नावाचे आश्वासन मिळाले. पूर्वीच्या सरकारने शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव केला होता, पण आमच्या समितीने लढा करून तो ठराव बदलायला लावला. ते सरकार अल्पमतात आल्याने त्यांनी शेवटच्या दिवशी जाता जाता ठरावाची घोषणा केली. मात्र त्यानंतर आलेल्या आणि विद्यमान महायुतीच्या सरकारने विधानसभा आणि विधान परिषदेत दिबांच्या नावाचा ठराव मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा खारघरला कार्यक्रमानिमित्त आले होते, त्यावेळी त्यांनी या विमानतळावरून विमान टेक ऑफ होईल तेव्हा ‘दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर तुमचे हार्दिक स्वागत असो’ अशी घोषणा होईल असे जाहीर केले आहे. मध्यंतरी विमानतळाचे काम सुरु असताना तत्कालीन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पाहणी भेट दिली असताना आम्ही समितीने त्यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी दिबांचेच नाव विचाराधीन असल्याचे सांगितले. अनेक कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली केंद्र सरकारकडून माहिती घेतली, त्यांनाही दिबांच्या नावाची एकमेव शिफारस राज्य सरकारकडून आल्याचे लेखी उत्तर मिळाले. हे नाव विचाराधीन आहे म्हणजे दुसऱ्या कुठल्याही नावाचा विचार नाही असे स्पष्ट केले आहे. समितीने केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत दिबांच्या नावाचा दुजोरा दिला आहे. पनवेलमध्ये पत्रकाराच्या जवळपास सहा संघटना आहेत मात्र या सर्व पत्रकारांनी एकजूट करत नामदार मोहोळ यांची परवा भेट घेतली आणि त्यांनाही स्पष्टपणे दिबांशिवाय दुसरे नवी नाही, असे सांगितले आहे. दिबांच्या नावाबाबत सुरळीतपणे काम सुरु असताना अचानकपणे घुसखोरी करण्याकरिता खासदार बाळयामामा म्हात्रे हे आमच्या समितीमध्ये घुसायला पहात आहेत. ते संघटनेत आलेले नाहीत सदस्य पदाधिकारी नाही, कशाही प्रकारे त्यांचा प्रकल्पग्रस्त समितीशी संबंध नाही, त्यांची समिती असेल तर भिवंडीपुरती. पनवेल, उरण, नवी मुंबई रायगडशी त्यांचा काडीचाही संबंध नाही. पेण, पनवेल, उरण, अलिबाग, नवी मुंबई आदी परिसरात आगरी समाज मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या बहुजन समाजातून निवडून आले आहेत म्हणून खासदार संजय पाटील आणि बाळयामामा म्हात्रे यांचा आगरी समाज मेळाव्यात सत्कार केला गेला. आम्ही सत्कारापुरते बोलावले ते सत्कारापुरते आले. बाळयामामा म्हात्रे मला भेटायला आले तेव्हा सरकारचे लक्ष वेधायचे आणि दिबांना रॅली काढून जासई येथे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करायचे आहे असे सांगितले. दिबासाहेब प्रकल्पग्रस्तांचे दैवत आहे त्यामुळे दिबांना अभिवादन करायला कुणाचीच हरकत नसल्याचे मी स्पष्ट केले. मात्र त्यानंतर बाळयामामांचा तोंड सुटायला लागला आहे. मीच एकटा लढत आहे आणि माझ्यामुळेच दिबांचे नाव मिळणार आहे, असा धिंडोरा करत आहे. नुकताच नवी मुंबईत समितीची बैठक झाली त्या बैठकीला खासदार संजय पाटील व बाळयामामा म्हात्रे हे सुद्धा आले होते. त्या बैठकीत नावाच्या बाबतीत एक दोघांनी शंका निर्माण केली त्यावर संघटनेने सांगितले कि अशी काही नावे येत असतील तर सांगा त्याची चौकशी करू मात्र कुणीही सांगायला तयार नव्हता, असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नमूद केले.
लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती एक मताने काम करत आहे मागचे पुढचे विसरून दिबांच्या नावासाठी एक संघ आहे. मात्र परवा बाळयामामा म्हात्रे यांनी कोपर खैरणे येथे बैठक घेऊन ०६ ऑक्टोबरला विराट मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले. त्याची बातमी फोटोसह प्रसिद्ध केली. या मोर्चात सहभागी होण्यासाठी पाचही सागरी जिल्ह्यातील भूमिपुत्र संघटना आणि प्रतिनिधींना कळविण्यात आले आहे असेही नमूद केले आहे विशेष म्हणजे समितीला याची काहीही माहिती त्यांनी दिली नाही. त्याचबरोबर या बातमीत जाणीवपूर्वक माझे नाव टाकले आहे. बनावट बातम्या टाकून आम्हाला बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे. मी त्या बैठकीला हजर नव्हतो. मी तात्काळ संबंधित वर्तमानपत्रांना फोन केला त्यावेळी त्यांनी बातमी तिकडून आल्याचे सांगून याबाबत दिलगिरी व्यक्त करून खुलासा करण्याचे मान्य केले आहे. असल्याचेही त्यांनी सांगितले. खासदार म्हणून संसदेत प्रश्न विचारला. खासदार आहात संसदेत प्रश्न मांडायचा तुमचा अधिकार आहे. आयत्या बिळात नागोबा त्याप्रमाणे मीच केला असा कांगावा केला गेला आहे, अशी जोरदार टीकाही त्यांनी यावेळी केली. तसेच दिबांचे नाव विचाराधीन असल्याचे उत्तर आमच्या समितीमधील विनोद म्हात्रे यांना सरकारकडून आले आहे. तुम्ही तर खासदार आहात मग तुम्हाला का उत्तर मिळत नाही, असा खडा सवालही त्यांनी उपस्थित केला. आधी दिबांचे नाव मगच विमानाचे उड्डाण, असे बाळ्यामामा म्हणत आहेत. मात्र, असा कोणताही प्रस्ताव कृती समितीने सरकारला दिलेला नाही. आमचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागरी उड्डाण मंत्री यांच्या शब्दावर विश्वास आहे. मुख्यमंत्री म्हणालेत की, टेक ऑफ होईल तेव्हा लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव जाहीर होईल. असे सर्व सुरळीत असताना बाळ्यामामा यात घुसले आहेत आणि सर्वकाही आपणच करत असून श्रेयासाठी आटापिटा करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्र सरकारमधील मंत्री यांनी यांनी विमानाचे टेक ऑफ होईल तेव्हा दिबांचे नाव जाहीर होईल असे स्पष्टपणे सांगितले आहे. अगोदर व्हावे हि आमची अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने समिती प्रयत्न करीत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत त्यांच्यावर आमचा भरवसा आहे. लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती दिबांच्या नावासाठी खंडपणे काम करत आहे, समिती ठरवेल त्याच दिशेने मार्गक्रमण केले जाणार आहे त्यामुळे त्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न बाळयामामा म्हात्रे यांनी करू नये असा सल्लाही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिला.

‘आजचा सत्कार विलक्षण आहे तो मी विसरूच शकत नाही’ – पद्मश्री अशोक सराफ

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!