भिवंडी दि.१५: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी लावून धरली आहे. केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भिवंडीतील मानकोली ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत २२ ते २४ डिसेंबर रोजी पदयात्रा मोर्चा आंदोलनाचे आयोजन खासदार बाळ्या मामा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. या पार्श्व भूमीवर रविवारी गुंदवली गावातील नागरिकांनी गावातून भव्य पदयात्रा रॅली काढली होती.
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे अशी मागणी यावेळी स्थानिक नागरिकांनी केली.टाळ मृदुंगाच्या गजरात निघालेल्या या रॅलीत जिल्हा परिषद शाळा गुंदवलीचे विद्यार्थी, गावातील नागरिक,युवक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
स्थानिक भूमिपुत्रांची ही मागणी केंद्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्षित करीत असून, आता नाही तर कधीच नाही या उक्तीप्रमाणे तीन दिवस सर्व नागरिकांनी एकत्रितपणे दि.बांच्या सन्मानार्थ २२ डिसेंबर रोजी निघणाऱ्या पदयात्रा आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी गुंदवली ग्रामपंचायतचे उपसरपंच सुमित बाळ्यामामा म्हात्रे यांनी नागरिकांना केले.
समाजातील सर्व जाती पातीतील नागरिकांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र येऊन सरकारला जागे करण्याची वेळ आता आली असून त्यासाठी सर्व नागरिकांनी एकत्र येऊन दि.बांच्या सन्मानार्थ मोठ्या संख्येने पदयात्रा आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन ग्राम पंचायत गुंदवलीचे माजी सरपंच मनेश म्हात्रे यांनी यावेळी केले.
![]()
