येत्या तीन महिन्यांमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करू – मुख्यमंत्री
मुंबई दि.३: नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते, लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव दिले जाणार आहे, येत्या तीन महिन्यांमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय कृती समितीला दिली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ८ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिनकर बाळू पाटील अर्थात दि. बा. पाटील यांचे नाव मिळावा यासाठी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने स्थानिक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या ताकदीवर जोरदार लढा देण्यात आला. आंदोलने, मोर्चे, मानवी साखळी, बैठक, जनजागृती, लाखो भूमिपुत्रांच्या उपस्थितीत सिडको घेराव आंदोलन अशा अनेक प्रकारे लढा देण्यात आला. दिबांच्या नावाचा जोरदार गजर करण्यात आला. आज सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या बैठकीत दिबासाहेबांच्या नाव देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत सांगितले की, या विमानतळासाठी एकच नाव पाठवण्यात आले आहे. आम्ही विमानतळाला तेच नाव देणार आहोत असे मुख्यमंत्री म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नवी मुंबई विमानतळाचा विषय देखील होता. पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की राज्य सरकारचा जो निर्णय असेल तो अंतिम असेल. तसेच या संदर्भातील सर्व अधिकार राज्य सरकारकडे देण्यात येतील. या संदर्भातील ठराव मंजूर होऊन राज्याला तो अधिकार दिला जाईल. त्या कामासाठी जो वेळ लागेल त्यानुसार येत्या तीन महिन्यांमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करू असे त्यांनी समितीला आश्वासित केले.
या बैठकीला माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे वने मंत्री गणेश नाईक, लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार विक्रांत पाटील, माजी आमदार राजू पाटील, दिबांचे चिरंजीव अतुल पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, कॉम्रेड भूषण पाटील, संतोष केणे, नंदराज मुंगाजी, यांच्यासह सर्वपक्षीय कृती समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
