पनवेल दि.13: नागरिकांना आजही मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी अनेक प्रकारचा त्रास उद्भवत आहे. महागाई व बेरोजगारी त्यात कोरोनाच्या जैविक संकटाची भर यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कंबर मोडली आहे. कोरोना परिस्थितीतून हळूहळू देश बाहेर पडत असला तरी झालेल्या लॉकडाऊन मुळे उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारावर ताण पडला आहे.
महावितरणाचा वाढीव बिलांचा शॉक, शाळेची फी वसुली, हॉस्पिटलचा अवाजवी बिलांसंदर्भात मनमानी कारभार यात नागरिक पुरते अडकले आहेत.
नागरिकांवर येणारा आर्थिक ताण लक्षात घेता मृत्यू नंतर तरी “मरण” स्वस्त व्हावे यासाठी इतर महानगर पालिकांप्रमाणे पनवेल महानगर पालिकेमध्येही अंत्यविधीसाठी लागणारी लाकडे मोफत देण्यात यावीत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे करण्यात आली. यावेळी पनवेल मनसेचे कामोठे शहराध्यक्ष रोहित दुधवडकर, उप शहराध्यक्ष मनोज कोठारी, विशाल चौधरी उपस्थित होते.
तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांना यासंदर्भात त्यांचा कार्यकाळ असताना या बाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता. तेव्हा मोबाईलच्या टॉर्च मध्ये पनवेल मध्ये अंत्यविधी करण्याचा प्रकार घडला होता. करंजाडे मधील स्मशानभूमीतील अपुऱ्या व्यवस्थेमुळे कामोठे येथे अंत्यविधी करण्याची घटना नुकतीच घडली होती.