माथेरान दि.११ (मुकुंद रांजणे) : एक तपाहुन अधिक काळ कडवट संघर्ष झेलत आणि खडतर आव्हाने पेलून अशक्य ते शक्य करण्याची खरी धमक आणि जिद्दीने यशाचे शिखर गाठण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा हेच खरे हातरीक्षा संघटनेच्या सदस्यांचे द्योतक असून खऱ्या अर्थाने स्वतःच्या खिशाची पदरमोड करून हातरीक्षा चालकांना अमानवीय प्रथेतून बाहेर काढण्यासाठी निवृत्त प्राध्यापक सुनील शिंदे यांनी दिलेल्या लढ्यामुळेच एकूण ९४ पैकी वीस हातरीक्षा मालकांना सद्यस्थितीत १० जून २०२४ रोजी हक्काची ई रिक्षा प्राप्त झाली. आजच्या घडीला ई रिक्षा एक वर्षांची झाली आहे. ई-रिक्षा मालकांच्या ताब्यात आल्यापासून अत्यंत प्रामाणिकपणे प्रवाशांना सेवा उपलब्ध करून देत आहेत. सर्वांशी आपुलकीने आणि आदराने वेळेत सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. एकूण ९४ पैकी वीस जणांना ई रिक्षाचा लाभ मिळाला असला तरी सुद्धा उर्वरीत ७४ ई रिक्षा लवकरच सुरू होणे आवश्यक आहे. हातरीक्षा ओढण्याची ही अमानवीय प्रथा पूर्णपणे अद्यापही संपुष्टात आलेली नसून आजही अनेकजण हातरीक्षा ओढून आपल्या कुटुंबाला आधार देत आहेत.ज्यावेळी उर्वरीत सर्वच ई रिक्षा सुरू होतील तो दिवस हातरीक्षा चालक मालक वर्गासाठी आणि इथल्या पर्यटनाला चालना देणारा सुवर्णक्षण,ऐतिहासिक दिवस असेल आणि त्याच दिवसाची वाट अन्य हातरीक्षा चालक – मालक वर्ग चातकाप्रमाणे प्रतीक्षेत आहेत. सद्यस्थितीत वीस ई रिक्षा पैकी पंधरा रिक्षा शालेय विद्यार्थ्यांची ने आण करीत आहेत आणि पाच ई रिक्षा ह्या प्रवाशांना सेवा देण्यासाठी खूपच कमी पडतात. त्यासाठी राज्य शासनाच्या कार्यक्षम मंत्री महोदयांनी पर्यटन क्रांती घडवून आणण्यासाठी दुर्गम माथेरान कडे आपले लक्ष केंद्रित करून ह्या स्थळाला जगाच्या नकाशावर अग्रस्थानी आणावे अशी अपेक्षा श्रमिक वर्ग व्यक्त करीत आहेत.
१० जून २०२४ ते १० जून २०२५ या कालावधीत एकूण २ लाख प्रवाशांनी ई रिक्षाचा लाभ घेतला आहे. ३५० शालेय विद्यार्थ्यांना नियमितपणे सेवा दिली जाते.
एका वर्षात एकूण ५९२ रुग्णांना हॉस्पिटलची सेवा उपलब्ध करून दिली आहे. जेष्ठ नागरिक आणि दिव्यांगांची पायपीट थांबली आहे. आपत्कालीन चोवीस तास सेवा उपलब्ध आहे.
माथेरानला 1992 साली शेवटच्या हात रिक्षाला पोलीस स्टेशन ने परवानगी दिली त्यामुळे 94 मधील अनेक चालक वयस्कर झाले आहेत स्वतः हात रिक्षा ओढू शकत नाहीत परंतु मजूर ठेवून आपली उपजीविका सुरू आहे देशाच्या राज्य घटनेतील कलम 19 अन्वये प्रत्येक नागरिकांना व्यवसायात बदल करण्याचा अधिकार दिले आहेत त्यानुसार परवानाधारक हात रिक्षा चालकांना ई रिक्षा ची परवानगी देण्यात यावी चालक स्वतः ई रिक्षा खरेदी करणार असल्याने सरकार वर आर्थिक भार पडणार नाही.
जनार्दन पार्टे – सामाजिक कार्यकर्ते
ई रिक्षाने माथेरानच्या पर्यटनात क्रांती केली आहे स्थानिक व पर्यटकांना हक्काची व परवडणारी वाहतूक सुरू झाली आहे तसेच हात रिक्षा चालकांची अमानवीय प्रथेतून मुक्ती होऊ शकली आहे मात्र फक्त वीस चालकांना ई रिक्षा ची परवानगी दिली आहे अद्याप 74 चालक प्रतिक्षेत आहेत हात रिक्षा परवाना हाच निकष धरून परवानगी दिली तरच ही अमानवीय प्रथा बंद होईल.
सुनिल शिंदे – याचिकाकर्ते
ई रिक्षा सुरू झाल्या आहेत ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. दरवेळी दस्तुरी वरून पायी चालत येताना दमछाक व्हायची ती आता या रिक्षांच्या माध्यमातून क्षमली आहे.सध्या वीस ई रिक्षा सुरू आहेत त्या खूपच कमी पडत असतात त्यात वाढ होणे गरजेचे आहे कमी रिक्षांमुळे सर्वांना वाट पहात बसावी लागते.
वृषभ नाईक – पर्यटक मुंबई
![]()
