ठाणे दि. २७: येत्या मंगळवारी 3 मार्च ग्रहणातच चंद्र उगवताना आपल्याला साध्या डोळ्यांनी पाहता येणार असल्याचे खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी सांगितले. चंद्रग्रहण हा एक नैसर्गिक अविष्कार आहे, तो सर्वांनी साध्या डोळ्यांनी पहायला पाहिजे. सध्या काही प्रसार माध्यमातून या चंद्रग्रहणाविषयी भीती दाखविली जात आहे, ती योग्य नाही. हे विज्ञानयुग आहे. शिक्षक-पालकांनी मुलांना चंद्रग्रहण दाखवून त्याविषयी माहिती करून द्यायला पाहिजे.
जेव्हा चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट छायेत येते तेव्हा चंद्रबिंब काळसर-लालसर रंगाचे दिसते. पृथ्वीच्या ज्या भागात चंद्र दृश्य आकाशात असतो तेथून ते चंद्रग्रहण दिसते. मंगळवार 3 मार्च रोजी दुपारी 3-20 वाजता चंद्रग्रहणास प्रारंभ होईल, परंतू त्यावेळी चंद्र आपल्या दृश्य आकाशात असणार नाही. तो पूर्व क्षितिजाखाली असेल. वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळ्यावेळी
ग्रहणातच चंद्र उगवतांना दिसणार आहे. सायंकाळी 6:48 या एकाचवेळी ग्रहण सुटणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळा वेळ हे चंद्रग्रहण दिसणार आहे. मुंबई येथे चंद्रोदय सायं.6:45 वाजता होणार आहे. ग्रहण सायं. 6:48 वाजता सुटणार आहे. म्हणजे मुंबईत फक्त 3 मिनिटे चंद्रग्रहण दिसणार आहे.पुणे 6:41, नाशिक 6:40, कोल्हापूर 6:40, नागपूर6:18, सोलापूर 6:33, रत्नागिरी 6:44, छ. संभाजी नगर 6:34 वाजता चंद्रोदय होणार आहे. सर्वत्र चंद्रोदयापासून 6:48 पर्यंत चंद्रग्रहण दिसणार आहे. ग्रहणवेधकाळात धूलीवंदन करता येते. होळीचा रंगांचा सण साजरा करता येतो.
काही लोक मला विचारतात “आमच्या राशीला हे ग्रहण कसे आहे ?” मी त्यांना सांगतो-” जे लोक चंद्रग्रहण पाहतील त्यांच्या राशीला हे ग्रहण शुभ आहे, कारण आलेल्या संधीचा त्यांनी ज्ञानात भर घालण्यासाठी उपयोग करून घेतला आहे.”

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!