येत्या मंगळवारी चंद्रग्रहण; ग्रहणातच चंद्र उगवणार !

या वर्षातील हे अखेरचे चंद्रग्रहण !
मुंबई दि.४:  येत्या मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेच्या रात्री खग्रास चंद्रग्रहण होणार असून ते महाराष्ट्रातून खंडग्रास स्थितीत चंद्र उगवताना दिसणार असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. या चंद्रग्रहणाविषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले, हे चंद्रग्रहण संपूर्ण आशिया, अमेरिका, ॲास्ट्रेलिया येथून दिसणार आहे. या वर्षातील हे अखेरचे चंद्रग्रहण आहे.
              चंद्रग्रहणास प्रारंभ दुपारी २-३९ वाजता होईल. दुपारी  ३-४७ ते ५-१२  संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थिती होईल. सायं. ६-१९ वाजता चंद्रग्रहण सुटेल. जेथे दृश्य आकाशात चंद्रबिंब असेल तेथे चंद्रग्रहण दिसेल. भारताच्या पूर्व भागात खग्रास स्थितीतच चंद्र उगवताना दिसणार आहे. कलकत्ता येथे खग्रास स्थितीमध्येच सायं. ४-५२ वाजता ‘ब्लड मून‘ – चंद्र उगवताना दिसेल. छायाचित्रकारांना ती एक पर्वणी असेल. उर्वरित भारतातून खंडग्रास स्थितीतच चंद्र उगवताना दिसेल. चंद्रग्रहण सायं. ६-१९ वाजता सुटेल.
           मुंबईतून पाहिल्यास सायं. ६ वाजून १ मिनिटांनी  खंडग्रास स्थितीतच चंद्र उगवेल. पुणे सायं. ५-५७, नाशिक सायं. ५-५५, औरंगाबाद सायं. ५-५०, नागपूर सायं. ५-३२ आणि कोल्हापूर सायं. ५-५८ वाजता खंडग्रास ग्रहणातच चंद्र उगवताना दिसेल. सायं. ६-१९ वाजता चंद्रग्रहण सुटेल. साध्या डोळ्यानी चंद्रग्रहणाचे दृश्य पाहता येईल. यानंतर भारतातून दिसणारे चंद्रग्रहण पुढच्या वर्षी २८ ॲाक्टोबर २०२३ रोजी होणार असल्याचे दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

error: Content is protected !!