चिरंजीवी व्यक्तिमत्त्वांना सामान्य बुद्धीक्षमतेने तोलता येत नाही, त्यासाठी समतोल आणि विवेकी बौद्धिक पातळी साध्य करावी लागते. चिरंजीवी आणि अजरामर व्यक्तिमत्त्वे नैसर्गिक पद्धतीने अस्तित्वात येत नाहीत, तर ती स्वतःच्या आयुष्यातील संघर्षातून तशी घडत असतात आणि आपल्या असामान्य कर्तृत्वाने अजरामर ठरत असतात. त्यांची विवेकबुद्धी, संयम, कार्यकुशलता, लोकसंपर्क आणि वैचारिक बैठक यामुळे त्यांचे स्थान समाजात निश्चित होत असते.
माझे वडील स्व. जनार्दन भगत अर्थात आबा यांचे स्थान याच पद्धतीने जनमानसात अजरामर आहे आणि म्हणूनच त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण त्यांची पंचमहाभूतांमधे अंतर्भूत असलेली चिरंतन ऊर्जा आणि प्रेरणा आत्मसात करण्यासाठी नेहमी त्यांचे आवाहन करीत असतो. पुण्यतिथीचा उपक्रम हा त्यासाठीच आपण राबवीत असतो.
आबांची सामाजिक, राजकीय आणि कौटुंबिक कारकीर्द ही सामान्यांच्या आकलनाच्या परीघाबाहेर आहे हे कोणीही सांगू शकेल कारण त्यांच्या कार्याचा आणि संघर्षाचा विस्तार तेवढाच मोठा आहे. आपल्या जीवनात एक संघर्षयोद्धा असलेले आबा शेवटपर्यंत एक भूमिपुत्र म्हणून जगले. एक शेतकरी म्हणून त्यांची दिनचर्या समोर येणाऱ्या समस्याग्रस्तांना, त्यांचे समदुःखी बनून, त्यांच्या अडचणी साम दाम दंड भेद या रणनीतीने समाजातील सक्षम व्यक्तींच्या सहकार्याने सोडविण्याचे आणि पिडीतांना न्याय देण्याचे सामाजिक काम करतानाच अव्याहतपणे वर्षानुवर्ष संपत आली हा आपल्यासमोर असलेला इतिहास आहे. त्यातूनच त्यांची ओळख एक न्यायबुद्धी असलेला, सामान्यांपासून वरिष्ठांपर्यंत पोच असलेला धुरंधर नेता तरीही एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व अशी बनली. घरगुती वादांपासून ते सरकारच्या अन्यायाविरोधात दाद मागण्यापर्यंत अनेक विषय आबांच्या जीवनात एका स्थितप्रज्ञ आणि विरक्त योगी पुरूषाप्रमाणे हाताळले गेले. त्यांची जगावेगळी कार्यशैली आज आपल्याला मंत्रमुग्ध करते आणि अशा पद्धतीने कामे करण्यासाठी आजच्या काळात तेवढ्या ताकदीच्या व्यक्तिमत्त्वांची कमतरता आपल्या लक्षात आल्यानंतर त्यांच्या अस्तित्वाची उणीव प्रकर्षाने आपल्याला भासते…..म्हणूनच त्यांच्या क्षमता आणि व्यक्तिविशेषांचे आवाहन आपल्याला आजही करावे लागते.
एक परिपूर्ण नेता आणि अजातशत्रू समाजसेवक कसा असावा याचे दुर्मिळ उदाहरण म्हणजे आबा. ज्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे आणि अखंड जनसेवेच्या वृत्तीचे स्मरण एक प्रेरणा म्हणून आपल्या आयुष्यात आपल्याला नेहमी आधारभूत ठरते. आपल्या प्रगतीच्या वाटेवर आपल्याला आबांसारखा एक दीपस्तंभ नेहमी आवश्यक असतोच. हा दीपस्तंभ आमच्या आयुष्यात मेरूपर्वतासारखा अढळ असल्यामुळेच किमान आम्हाला तरी आमच्या प्रत्येक क्षेत्रातील यशाची खात्री कायम असते.
एक धुरंधर राजकारणी, तर्कनिष्ठ विज्ञानवादी, लोकहितवादी शिक्षणतज्ञ आणि समाजकारणासाठी जगणारे विरक्त व्यक्तिमत्व म्हणून आबांचे कार्यमहात्म्य अलौकिक आहे आणि म्हणूनच त्यांची पुण्यतिथी हा गोरगरीब, कष्टकरी आणि सामान्य जनतेच्या आयुष्यातील एक आनंदसोहळा बनलेला आहे. वास्तविक अशा अद्वितीय व्यक्तिमत्त्वाला आपण ऐहिक पातळीवर मुकलो याची पावलोपावली जाणीव सध्याच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि आध्यात्मिक पातळीवर आपल्याला येणाऱ्या अनुभवांतून आपण घेत आहोत, पण अशा पुण्यस्मरणातून प्राप्त होणाऱ्या उर्जेतून आपण ही उणीव अंशतः भरून काढत असतो आणि आपल्या कार्याला दैवी गती देत असतो.
जनतेच्या प्रश्नांवर पोटतिडीकिने बोलणारा रोखठोक नेता आजमितीस सापडणे दुर्लभ झाले आहे. सामान्य माणसाचे दुःख समजून त्यांना न्याय मिळावा यासाठी भांडणारा राजकारणी, त्यांच्यासाठी सर्वार्थाने आपली शक्ती वापरणारा नेता दिसणे आज आपल्याला कठीण झाले आहे, आणि म्हणूनच आबांची गैरहजेरी प्रकर्षाने जाणवते. ते असते तर आपल्याला पदोपदी मार्गदर्शन करण्यासाठी आपला मार्गदर्शक पाठीशी आहे ही जाणीव आपल्यात राहून हाती घेतलेल्या कामांना आणि संकल्पांना एक धार आली असती. अशी परिस्थिती सध्या नाही हे दुःख व्यक्त करण्यासाठी पुण्यतिथी हे आज केवळ एक निमित्त आहे कारण प्रत्येक क्षणाला समोर येणारी परिस्थिती सामान्य माणसासाठी एक ज्वलंत संघर्षच आहे, जिच्यामधे आबांसारख्या ज्ञानपिपासू आणि प्रतिभावंत माणसाची गरज कायम भासते.
वैज्ञानिक दृष्टिकोन बोलणे फार सोपे असते पण त्याचा आयुष्यात आचार करणे महाकठीण. शंभर टक्के विवेकवादी असणे सोपे आहे, पण शंभर टक्के विवेकवादी जीवन जगणे अत्यंत अवघड आहे. सामान्यांसाठी तर ही अशक्यप्राय बाब आहे. विवेकवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्यासाठी प्रसंगी एकादशीलाही मांसाहाराचे समर्थन करणाऱ्याला समाजाकडून शिव्यांची लाखोली निश्चितच वाहिली जाते, पण संत तुकोबांप्रमाणे, महात्मा ज्योतिबांप्रमाणे स्थितप्रज्ञ राहून या परिस्थितीला संयमी वृत्तीने सामोरे जाऊन निव्वळ स्वतःच्या अजातशत्रुत्वाच्या ताकदीवर अनुयायांच्या गळीसुद्धा विज्ञाननिष्ठा उतरवण्याचे कौशल्य फक्त आबांकडेच होते. पुरोगामी विचारांना छेद देणारे शब्द वापरून स्पष्ट करायचे तर ही दैवी आणि अलौकिक ईश्वरी देणगी आबांना प्राप्त होती असे म्हणावे लागेल.
विज्ञाननिष्ठ समाजप्रबोधनकार, शिक्षकांसोबतच शिक्षणाचाही कैवारी, समाजकारणासाठी राजकारण करणारा लोकनेता, शांतिदूत म्हणून वागणारा तरीही जनतेच्या हक्कांसाठी आयुष्यात कठोर संघर्ष करणारा आणि त्यासाठी आवश्यक दैवी गुण धारण करणारा युगपुरूष, स्वातंत्र्यासाठी स्वतःची प्रतिभा आणि क्षमता खर्ची घालणारा एक जगावेगळा नेता, नव्हे, ‘लोकनेता’ ही स्वर्गीय जनार्दन भगत अर्थात आमचे आबा यांची ओळख आजच्या दिवशी अधोरेखित करण्याचे भाग्य आम्हाला प्रतिवर्षी लाभते यासाठी आम्ही ईश्वराचे आभार मानावेत की अशा व्यक्तिमत्वाला आणि त्याच्या उपयोगितेला पारखे करून आम्हाला निष्प्रभ केल्याबद्दल त्याला दोष द्यावा हेच काही काळ लक्षात येत नाही.
शिक्षण आणि शिक्षकाचे हितचिंतक, थोर समाजसेवक, विज्ञाननिष्ठ नागरिक, न्यायप्रिय आणि शांतताप्रिय नेतृत्व, कामगार नेता, कुटुंबवत्सल पिता आणि पती, स्वातंत्र्ययोद्धा, सक्षम आणि सुजाण राजकारणी या आणि इतर अनेक रूपांनी स्वतःचे अद्वितीयत्व सिद्ध केलेले स्व जनार्दन भगत हे जन्मदाते म्हणून आम्हाला लाभले हे आमचे भाग्य आहे. त्यांचा आदर्श आणि शिकवण हेच आमचे भांडवल आहे. या भांडवलावर फक्त आम्हीच नव्हे….तर या पंचक्रोशीतील लाखो लोक प्रेरित होऊन आबांच्या जीवनकार्यात अपूर्ण राहिलेल्या कार्याला पूर्णत्वाकडे नेत रहातील याची मला खात्री आहे आणि त्यासाठीच कायम प्रयत्नशील रहाण्याची जिद्दही आहे….हे स्वतःला आणि आबांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणाऱ्या सर्व समाजधुरिणांना पटवून देण्याची संधी मिळत रहावी यासाठी आबांची पुण्यतिथी हा न चुकता पार पाडण्याचा आध्यात्मिक दृष्टिकोनातून धार्मिक वाटणारा पण मानवी दृष्टिकोनातून सामाजिक आणि सामान्य जनतेला ऊर्जादायी ठरणारा हा उपक्रम आम्ही सर्वजण, मनाला कितीही वेदना होत असल्या तरी आग्रहाने करतो….यामागेही आबांचे लोकविलक्षण कार्य हीच प्रेरणा आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने आज आपण त्यांचे आणि त्यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या आत्म्यास चिरंतन शांती लाभावी आणि दुरितांचे उत्थान व्हावे या हेतूने त्यांच्या दैवी गुणांची धारणा काही अंशी आपल्या ठायी अस्तित्वात यावी यासाठी प्रयत्नशील रहाण्याचा संकल्प करणे आणि त्याचहेतूने त्यांचे आवाहन करणे हे आपले सर्वांचेच आद्य कर्तव्य आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!