विश्रांतीनंतर माथेरानची राणी पर्यटकांच्या सेवेत धावली
माथेरान दि,६ (मुकुंद रांजणे) माथेरानच्या राणीने अखेर पुन्हा येकदा सह्याद्रीच्या डोंगररांगेत शीळ फुंकले आहे. पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी मान्सून काळात विश्रांतीसाठी गेलेली माथेरानची राणी तब्बल पाच महिन्याच्या विश्रांती नंतर पर्यटकांच्या सेवेत धावली आहे. अबालवृद्ध आणि लहान मुलांपासून तरुणांसाठी ह्या राणीचे आकर्षण असते. दरम्यान माथेरानची राणी अर्थात मिनी ट्रेन आज सकाळी 8 वाजून 50 मिनिटाच्या शुभमुहूर्तावर म्हणून पहिली ट्रेन रुळावरून धावली. ट्रेनचे चालक आणि स्टेशन प्रबंधक यांच्या हस्ते पूजा अर्चा करून, श्रीफळ वाढवत भंडारा उधळवून या ट्रेनचे स्वागत करण्यात आले होते तर हिरवा झेंडा दाखवून ट्रेन नेरळ रेल्वे स्थानकातून माथेरान दिशेकडे प्रस्थान झाली. दरम्यान प्रवास करणाऱ्या पर्यटकांमध्ये आनंद दिसून येत होता.
समुद्रसपाटीपासून ८०० मीटर उंचावर सह्याद्रीच्या खोऱ्यात डोंगर माथ्यावर माथेरान हे थंड हवेचे शहर वसलेले आहे.वर्षाकाठी लाखो पर्यटक माथेरान शहरात हंगामात फिरायला येत असतात. माथेरान फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण हे येथील माथेरानची राणी अर्थात मिनी ट्रेन ही आहे. मात्र ही मिनी ट्रेन मान्सून काळात पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी बंद ठेवण्यात येते. माथेरानला पोहचण्यासाठी केवळ दोनच मार्गे आहेत. नेरळपासून घाट रस्ता मार्गे मोटर वाहणाने पर्यटक येवू शकतात आणि दुसरा रेल्वेमार्ग आहे. माथेरान मिनी ट्रेन शिरस्त्यानुसार दसऱ्याला हि सेवा पूर्ववत करण्यात येते. मात्र मान्सून काळात झालेल्या दुरवस्थेमुळे रेल्वे मार्ग दुरुस्ती आदिकारणांमुळे यावेळी उशीर झाला असला तरी पर्यटकांना मध्य रेल्वे प्रशासनाने आनंदाची बातमी आज दिली. आज पासून नेरळ माथेरान रेल्वे सेवा सुरु केली आहे. माथेरान सफर करण्यासाठी आलेल्या पर्यटकांना मिनी ट्रेन सुरु असल्याची माहिती मिळाल्यावर आनंदच झाला आहे. तर काही पर्यटकांनी भले पहाटेच नेरळ स्थानकात पोहचवून तिकिटासाठी रंग लावली होती. त्यामुळे पर्यटकांची नेरळ रेल्वे स्थानकात तिकिटासाठी गर्दी झालेली दिसली.
माथेरानच्या महाराणीची सफर करायला मिळणार या कल्पनेने पर्यटकांचा उत्साह शिगेला होता. त्यामुळे पहिल्या ट्रेनची एकूण १११ तिकिटे विक्री झाली त्यामध्ये द्वितीय वर्ग डब्याची ९० तिकिटे तर प्रथम वर्ग डब्याची २१ तिकिटे काही क्षणात संपली. तर दुसऱ्या ट्रेनसाठी पर्यटकांनी तात्काळ रांगा लावल्या होत्या. यावेळी एनडीएम ४०५ हे इंजिन ट्रेनला जोडणी करून मोटरमन भानुदास ठाणगे, गार्ड सुनील पाटील, वरिष्ठ शाखा अभियंता संजीव कुमार, शाखा अभिंता, शरद सानप, उप स्टेशन मॅनेजर राहुल कुमार, दगडू आव्हाड डिझेल लोको शेड, मध्य रेल्वे कमर्चारी यांच्यासह स्टेशन प्रबंधक गुरुनाथ पाटील यांच्या हस्ते इंजिनची पूजा करून पाटील यांनी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.
आम्ही दुसऱ्यांदा माथेरानला फिरायला येत आहोत. मात्र आमच्यासोबत आमचे राजस्थानचे कुटुंब देखील आहे. आम्हाला ट्रेन सुरु होणार आहे हे माहित नव्हतं. पण इथे आल्यावर ते कळलं आणि आमच्या आनंदाला पारावर उरला नाही. खूप उत्साहित आहोत या ट्रेनचा प्रवास करण्यासाठी.
- सपना जैन, प्रवासी ऐरोली
आज मध्य रेल्वेने नेरळ माथेरान सेवा सुरु केली आहे. दरवर्षी पावसाळयात सुरक्षेच्या दृष्टीने हि सेवा ४ महिने बंद ठेवण्यात येते. कोकणात माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडून रेल्वे ट्रॅक नादुरुस्त होत असतात. तेव्हा गेले काही महिने आमचे कर्मचारी ट्रॅक दुरुस्तीच्या कमला लागले होते त्यामुळे आज हि सेवा सुरु झाली आहे. दिवसभरातून २ सेवा चालवल्या जाणार आहेत. यासह अमान लॉज ते माथेरान शटल सेवा हि सुरूच आहे.
- गुरुनाथ पाटील, स्टेशन प्रबंधक नेरळ
