पनवेल दि.२३: डॉ. मानसी मोरे मेडिकल फाउंडेशन, एस. पी. मोरे कॉलेज ऑफ पॅरामेडिकल अँड नर्सिंग एज्युकेशन व आयरिस आय हॉस्पिटल पनवेल यांच्या सौजन्याने आदिवासी बांधवांकरीता रविवार दिनांक २० ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत धोदाणी पनवेल येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबिर घेण्यात आले.
शिबिरामध्ये साधारण १४५ लोकांनी सहभाग घेतला व त्यामध्ये १६ जणांना मोतीबिंदूचा आजार असल्याचे आढळून आले. संबंधित रुग्णांना आयरिस आय हॉस्पिटल पोदी नं १ ,सेक्टर १५, नवीन पनवेल येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिरामध्ये आलेल्या सर्व लोकांची योग्य तपासणी नेत्ररोग तज्ञ डॉ.मानसी शेळके (मोरे) आणि छाती व क्षयरोग तज्ञ डॉ.मृण्मयी मयेकर यांनी केली व ज्यांना गरज आहे अशा ११७ लोकांना मोफत चष्मे वाटप, मोफत आय ड्रॉप्स व मोफत औषधे वाटप करण्यात आले.
सदर शिबिर यशस्वी करण्याकरिता एस.पी.मोरे कॉलेज ऑफ पॅरामेडिकल व नर्सिंग एज्युकेशनचे डायरेक्टर आर्यन शेळके व कॉलेजमधील शिक्षक वर्ग अनिल मखामले, संघमित्रा हिवाळे, कॉलेजमधील शिक्षकेत्तर व विद्यार्थी वर्ग यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले.
धोदाणी गावातील सामाजिक कार्यकर्ते दामोदर रामा चौधरी, सीताराम जानु चौधरी, कैलास शंकर घुटे व पद्माकर रामा चौधरी, नारायण भाऊ चौधरी आदी उपस्थित होते.
