पनवेल दि.०२: स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशात राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी सन १९६१ मध्ये युसूफ मेहरअली सेंटर ची स्थापना करून मागील सात दशके अविरत सेवा करणारे, देशातील ११ राज्यांमध्ये सेंटरच्या शाखा निर्माण करून हजारो दीनदुबळ्यांचे आधार बनलेले गांधीवादी स्वातंत्र्य सैनिक तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ.जी.जी. पारिख यांचे आज सकाळी पाच वाजता मुंबई येथील त्यांच्या राहत्या घरी वयाच्या १०१ व्या वर्षी देहावसन झाले आहे.
१९४० साली जीजी परीख मुंबईत आले. सेंट जॉर्ज कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत. तेव्हा ते अवघ्या १६ वर्षांचे होते. त्याच काळात देशात स्वातंत्र्याचा लढा यशाकडे मार्गस्थ झाला होता. १९४२ च्या ७ आणि ८ ऑगस्टला मुंबईत ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची मिटिंग होती. गांधीजींनी ‘छोडो भारत’ची घोषणा दिली. आणि गांधीजींच्या विचारांनी भारावलेले जीजी सक्रीयपणे लढ्यात उतरले.
स्वत:च्या कॉलेजमध्ये ब्रिटिशांविरोधात तीन दिवसीय बंद पुकारला. त्याची निदर्शनं म्हणून चर्चगेट स्टेशनला जाऊन रेल्वे रोखल्या. यात जीजींना पोलिसांनी पकडलं आणि त्यांना तुरुंगात डांबलं साधारण अठरा एकोणीस वर्षांच्या जीजींना पहिल्यांदा १० महिन्यांचा तुरुंगवास झाला. पुढे लोकांच्या प्रश्नांसाठी तुरुंग वगैरे त्यांना नेहमीचे झाले.
१९४७ साली ते स्टुडंट काँग्रेसच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष होते. ते मूळचे समाजवादी विचारांचे होते. पुढे आपल्या विचारांवर जगण्याचा निर्णय घेतला. लोकांसाठी ते कायम लढत राहिले.
सहकारी चळवळ असो वा कामगार संघटना, किंवा खादी चळवळ असो, जी.जीं.चं योगदान बहुमोल आहे. अर्थात, त्यांनी या सर्व कार्याचा गवगवा कधीच केला नाही. सत्कार-समारंभ-गौरव वगैरे गोष्टींपासून ते कोसो दूर राहिले.
पनवेल जवळील कर्नाळा ग्रामपंचायत मधील तारा आणि बांधनवाडी इथे स्थित असलेली युसुफ मेहरअली सेंटर नावाची ही शाश्वत विकासाची प्रयोगशाळा पाहिल्यानंतर स्वतः गोल्ड मेडलिस्ट असलेले डॉक्टर यांनी उभे केलेले आभाळभर कार्य लक्षात येते. विशेष म्हणजे आपल्या तारुण्यातच जी जी पारीखांनी जे जे रुग्णालयाला आपले देहदान करण्याचे ठरविल्यामुळे आज सायंकाळी ३.०० वाजेपर्यंत मुंबई सेंट्रल येथील जनता केंद्र ताडदेव येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले व त्यानंतर मृतदेह जे. जे. रुग्णालयाला सुपूर्द करण्यात आले.
