पनवेल दि.५: टिव्हीवर मँच पहाणे दुरच, भारतात टिव्ही प्रेक्षपण सुरू होण्याच्या काळात पनवेलच्या मैदानावर सिझन क्रिकेटचे मैदान गाजविणारे क्रिकेटरांची पनवेलमध्ये तब्बल ५० वर्षांनंतर भेट झाली. १९६० साली स्थापन केलेल्या फ्रेड्स सर्कल क्रिकेट क्लबच्या मित्रांना महापालिकेच्या मैदानावरच नव्हे तर परिसरात अनेक सामने जिंकले, पनवेलच्या मैदानावर अनेक सामने रंगवलेल्या खेळाडूंना तरूण वयातील जुन्या आठवणींना उजाला देताना अश्रू आवरता आले नाहीत.
ऐतिसाहिक वारसा असलेल्या पनवेल शहरात अनेक श्रीमंत घराणी वास्तव्यास होती, सध्या या घराण्यांची पिढी देखील पनवेलमध्येच आहेत. वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिध्द असलेले पनवेल एकेकाळी क्रिकेटसाठी देखील प्रसिध्द होते. पनवेल नगरपरिषदेच्या मैदानावर १९६० पुर्वी शहरातील काही ठराविक घरातील मुले क्रिकेट खेळत असत. क्रिकेट खेळणे हौशी आणि श्रीमंतांचा छंद असलेल्या काळात सिझन क्रिकेट खेळला जात होता. सध्या संभाजी मैदान म्हणून प्रसिध्द असलेल्या मैदानाला कोणतेही नाव नव्हते, परंतू क्रिकेटसाठी हे मैदान प्रसिध्द होते. याच काळात क्रिकेटवेड्या तरूणांनी एकत्र येवून फ्रेड्स सर्कल क्रिकेट क्लबची स्थापना केली होती. शहरातील वेगवेगळ्या जातीधर्मांतील मुलांचा सहभाग असलेल्या संघटनेच्या ए आणि बी अशा दोन क्रिकेट टिम होत्या. ५१ तरूणांची फळी असलेल्या टीम केवळ पनवेलमध्येच नव्हे तर अलिबाग, मुंबई, ठाणे आदी ठिकाणी जावून अनेक चँम्पियनशिप मारत असे. टिमचे मेंबर असलेले आणि सध्या अमेरिकेचे नागरिक असलेले खलिल खतिब यांना सर्व मित्रांना एकत्र आणण्याची कल्पना सुचली. पनवेलमध्ये राहणारे क्रिकेटपट्टू मित्र अरविंद लोखंडे, सईद मुल्ला यांना सांगून या तिघा मित्रांनी इतर मित्रांचा शोध सुरू केला. बऱ्याच प्रयत्नांनतर ५१ जणांपैकी २१ जणांशी संपर्क झाला आणि १६ नोव्हेंबरला क्रिकेट खेळायला सुरूवात केलेल्या पनवेलच्या मैदानात भेटायचे ठरले. ५० वर्षांपेक्षा जास्त काळ न भेटलेले मित्र अखेर भेटले. क्रिकेट जिवनातील अनेक आठवणींना या मित्रांनी उजाळा दिला. आजारपणाच्या कारणामुळे तीन जण येवू शकले नाहीत, परंतू १८ जण एकत्र येवू शकले. हे सर्वजण ७० पेक्षा जास्त वयाचे आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड, तळेगाव, ठाणे मुंबईत स्थायिक झालेल्या क्रिकेटपटूंची भेट अविस्मरणीय ठरली. सोबत जेवण, गप्पा, कडू गोड आठवणींनी एक दिवस या मित्रांनी सोबत घालवला. कँन्सरमुळे आजारी असलेला मित्र मित्रांना भेटण्यासाठी कठीण काळात आला होता. फ्रेडस सर्कल क्रिकेट क्लबच्या स्थापनेत महत्वाचा वाटा असलेल्या ८५ वर्षांचे शरद आत्माराम आटवणे आवर्जून उपस्थित होते. पनवेलमध्ये सुरूवात करून रणजी क्रिकेटपर्यंत मजल मारलेले सुभाष पाटणे देखील हजर होते.
पनवेलचे माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला सिक्स मारण्यासाठी प्रसिध्द होते, त्यामुळे त्यांना मिया छकडी नावाने ओळखले जात असल्याची आठवण त्यांनी सांगितली. ८० वर्षांचे मुल्ला आजही पनवेलमध्ये टेनिस क्रिकेट खेळतात हे ऐकूण मित्रांना आश्चर्यांचा धक्का बसला. आम्हाला मार्गदर्शन मिळाले नाही अन्यथा आम्ही भारतीय क्रिकेट टिममध्ये स्थान निर्मांण करू शकलो असतो अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.