पनवेल दि.15: कर्नाळा बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेचे अध्यक्ष व शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांना आज अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली. विवेक पाटील यांना त्यांच्या पनवेल येथील घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. या घोटाळ्याविरोधात सर्वप्रथम कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी आवाज उठवून ठेवीदारांना न्याय देण्याची मागणी केली होती. त्यानुसार अखेर कारवाई झाली आहे. कर्नाळा बँक घोटाळ्यात पैशांची अफरातफर (मनी लॉण्डरिंग) झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. 2019 सालापासून पैसे परत न मिळाल्यामुळे हवालदिल झालेल्या ठेवीदारांना राज्य सरकारकडून न्याय मिळाला नाही, पण ईडीमार्फत झालेल्या या कारवाईमुळे आता ठेवीदारांचे दडवलेले पैसे परत मिळण्याच्या दृष्टिकोनातून सुरुवात होईल, अशी भावना आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी व्यक्त केली आहे.