पनवेल दि.४: रायगड जिल्ह्यातील जल जीवन मिशन अंतर्गत प्रलंबित असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आमरण उपोषणाला अखेर यश आले असून पनवेल तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आपटा हद्दीतील कोरळवाडी आदिवासी वाडीत पिण्याचे ट्रीपल फिल्टर्ड शुद्ध पाणी पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या लेखी विनंतीनुसार उपोषणकर्त्यांनी आपले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. मात्र रायगड जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत बाराशे कोटी च्या योजनांचे कार्यारंभ आदेश देऊन सुमारे दोनशेहून अधिक आदिवासी वाड्या तहानलेल्याच असल्यामुळे रायगड जिल्ह्यातील जल जीवन मिशन योजनेच्या चौकशीवर आम्ही ठाम असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी सांगितले आहे. दरम्यान कोरळवाडीसाठी मंजूर झालेली पाणी पुरवठा योजना तीन वर्षे अपूर्ण राहिल्याने संतप्त झालेल्या आदिवासी भगिनींनी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली २६ फेब्रुवारी २०२६ पासून रायगड जिल्हा परिषद, अलिबाग येथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी बेबी दशरथ वाघे (वय ४६) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेनंतर शनिवारी आमदार नितीन राऊत यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात रायगड जिल्ह्यातील जल जीवन मिशन योजनेबाबत तारांकित प्रश्न विचारल्याने प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला व त्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी घटनास्थळी पोहोचून तातडीने काम सुरू करीत पाणीपुरवठा सुरू करून उर्वरित तांत्रिक कामेही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल अश्या आशयाचे लेखी पत्र कार्यकारी अभियंत्यांचे प्रतिनिधी वरिष्ठ सहाय्यक रवींद्र सोनारघरे, रुपेश राजगे, कनिष्ठ सहाय्यक संकिता पाटील, चैताली म्हात्रे ह्यांनी उपोषण स्थळी जाऊन उपोषणकर्त्यांना देत आमरण उपोषण मागे घेण्याची विनंती केल्याने उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण तात्पुरते स्थगित केले.मात्र उर्वरित तांत्रिक कामे पूर्ण करून योजना नियमित व सुरळीत चालू राहील याची खात्री प्रशासनाने द्यावी, अन्यथा पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
स्वातंत्र्याच्या ७९ वर्षानंतर कोरलवाडीत जरी पाईपलाईनद्वारे पाणी पोहोचला असला तरीही रायगड जिल्ह्यात जल जीवन मिशन योजनेसाठी सुमारे 1200 कोटी रुपयांच्या कामांची चौकशी होईपर्यंत पाठपुरावा सुरू राहील. कारण रायगड मध्ये अजून शेकडो आदिवासी वाड्या तहानलेल्या आहेत. – संतोष ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते ,ग्राम संवर्धन सामाजिक संस्था
![]()
