ॲम्बुलन्स चालक-मालक जनहित संस्थेची भव्य विजयी रॅली
पनवेल दि.९: इंडिया टीम ने ICC T20 वर्ल्ड कप स्पर्धेत तिसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवत संपूर्ण देशाचा अभिमान उंचावला आहे. आतापर्यंत कोणत्याही देशाने तीन वेळा टी-२० विश्वचषक जिंकण्याची किमया साधलेली नव्हती. भारताने ही अभूतपूर्व कामगिरी करत क्रिकेट विश्वात आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या ऐतिहासिक विजयामुळे संपूर्ण देशभरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून प्रत्येक भारतीयाला आपल्या क्रिकेट संघाचा अभिमान वाटत आहे.
या अभिमानाच्या भावनेतून पनवेल शहरातील ॲम्बुलन्स चालक-मालक जनहित संस्थेच्या वतीने भव्य विजयी रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीद्वारे संस्थेच्या सदस्यांनी भारतीय क्रिकेट संघाला मानाचा मुजरा देत त्यांच्या विजयाला सलामी दिली. रॅलीदरम्यान ॲम्बुलन्स वाहनांना तिरंगा ध्वज लावून शहरातून फेरी काढण्यात आली. “भारत माता की जय”, “जय हिंद, जय भारत”, “भारतीय क्रिकेट संघाचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आणि नागरिकांमध्येही देशभक्तीची भावना जागृत झाली.
रॅलीमध्ये संस्थेचे अध्यक्ष मुकुंद कांबळे, सचिव विजय जाधव, उपाध्यक्ष प्रकाश जाधव, पनवेलचे सचिव राज निम्बर्गी, सहखजिनदार कैलास नेमाडे, पनवेलचे खजिनदार भरत पाटील यांच्यासह संतोष निम्बर्गी, अनिकेत नेमाडे, संजय जाधव, गणेश खंदारे, हरीश कांबळे, ज्ञानेश्वर जाधव, तनवी विजय जाधव, पूर्वी विजय जाधव आणि इतर अनेक सदस्य मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. या सर्व सदस्यांच्या उपस्थितीमुळे रॅलीची शोभा अधिकच वाढली.
या वेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय क्रिकेट संघाने देशासाठी मिळवलेला हा विजय प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे. खेळाडूंनी दाखवलेली मेहनत, जिद्द आणि देशासाठी खेळण्याची भावना ही प्रेरणादायी असून तरुण पिढीला त्यातून मोठा संदेश मिळतो. त्यामुळेच पनवेलमधील ॲम्बुलन्स चालक-मालकांनी आपल्या पद्धतीने हा आनंद साजरा करत भारतीय संघाला सलामी देण्याचा निर्णय घेतला.
या विजयी रॅलीमुळे पनवेल शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनीही रॅलीचे स्वागत करत भारतीय क्रिकेट संघाच्या या ऐतिहासिक यशाबद्दल आनंद व्यक्त केला. देशाच्या गौरवासाठी खेळणाऱ्या खेळाडूंना सलाम करत सर्वांनी एकमुखाने जय हिंद, जय भारतच्याघोषणा दिल्या.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!