पनवेल दि.१४: महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन स्पर्धेत रायगडच्या अंडर-17 मुलींनी चमकदार कामगिरी करत विजेतेपद पटकावला. बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगड (बीओआर) मुलींच्या संघाने “योनॅक्स-सनराई आमदार स्व. अरुणकाका बालभिमराव जगताप स्मृती महाराष्ट्र सब-ज्युनिअर आंतर जिल्हा (अंडर 17) आणि अंडर 15 व अंडर 17) राज्य बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ही स्पर्धा अहिल्यानगर येथे पार पडली.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील खेळाडूंच्या सहभागामुळे ही राज्यातील सर्वाधिक स्पर्धात्मक स्पर्धापैकी एक ठरली. रायगड संघाकडून उत्कृष्ट कौशल्य, संघभावना आणि जिद्दीने खेळ करणाऱ्या खेळाडूंमध्ये गाथा सूर्यवंशी, अनुष्का एप्टे, आयुषी निरवाण, ऋधिमा म्हात्रे, अनरिया सिंग आणि अनन्या सिंग यांचा समावेश होता.
या यशामागे प्रशिक्षक श्रीशैल मिटकरी आणि संघव्यवस्थापक प्रशांत मुखर्जी यांचे मार्गदर्शन आणि मेहनत मोलाची ठरली.
संघाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, तसेच बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगडचे अध्यक्ष परेश ठाकूर, उपाध्यक्ष रविंद्र भगत, शिवकुमार करयिल यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
रायगड बॅडमिंटनसाठी हे यश आणखी एक अभिमानास्पद पर्व ठरले असून, या खेळात जिल्ह्याची वाढती ताकद आणि गुणवत्ता अधोरेखित करणारे आहे.
