पनवेल दि.१४: पनवेल, उरण आणि खालापूर तालुक्यात सुरू असलेल्या जल जीवन मिशन योजना रखडल्या आहेत, कारण एकच ठेकेदार अनेक ठिकाणी असून ते काम करीत नाही. सरपंच किवा अधिकार्‍यांचे फोनही घेत नाही. काही ठिकाणी त्यांनी पोट ठेकेदार नेमले आहेत. तेदेखील काम करीत नाहीत. त्यामुळे ही योजना वेळेत पूर्ण होण्यासाठी अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून नवीन ठेकेदार नेमावा, अशी सूचना आज पनवेल येथे झालेल्या आढावा बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकार्‍यांना दिल्या.
जल जीवन मिशन योजनांच्या कामाबाबत पनवेल, उरण आणि खालापूर तालुक्यातील अनेक सरपंच व नागरिकांच्या तक्रारी आल्याने आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांनी रायगड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांना आढावा बैठक घेण्यास सांगितले होते. त्यानुसार पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या हॉलमध्ये झालेल्या या बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जि.प.चे सीईओ डॉ. भरत बास्टेवाड, जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वेंगुर्लेकर, पनवेलचे गटविकास अधिकारी संजय भोये, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक व ठेकेदार उपस्थित होते.
या वेळी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीतील जल जीवन मिशन योजनेचा आढावा घेण्यात आला. २०२२ मध्ये कामाची वर्कऑर्डर निघूनही अद्याप काम सुरू नाही, तर काही ठेकेदारांनी काम सुरू करून बंद केले आहे. फक्त पाईप आणून ठेवले आहेत. काहींना रक्कम वाढवून पाहिजे, तर काहींनी ८० टक्के रक्कम घेऊन पुढील काम बंद केले असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक ठेकेदार निविदा मंजूर झाल्यापासून त्या गावात गेलेलेच नाहीत. काही फक्त एकदाच जाऊन आले आहेत. ते सरपंच, ग्रामसेवक किवा अभियंत्यांचे फोन घेत नसल्याच्या तक्रारी या वेळी करण्यात आल्या. काही ठेकेदारांनी आजची बैठक लावल्यावर एक दिवस येऊन काम केल्याचे दिसून आले, तर अनेक ठेकेदार बोलावूनही या बैठकीला आले नाहीत. काही गावात पाण्याच्या टाकीसाठी जागा दिली नसल्याचे दिसून आले. त्याबाबत अधिकार्‍यांनी लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करून तो प्रश्न सोडवावा असे सांगण्यात आले. वनखात्याच्या जागेचा प्रश्न रायगड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी सोडवला असल्याने तेथील काम ताबडतोब सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या वेळी आमदार महेश बालदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी असलेल्या जल जीवन मिशन योजनेचे काम रखडवणार्‍या ठेकेदारांना कायमस्वरूपी शासनाच्या काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. जनतेशी असे खेळणार्‍या ठेकेदारांना अद्दल घडवणे गरजेचे असल्याचे सांगून लगेच नवीन ठेकेदार नेमून काम सुरू करावे, असे सांगितले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी न्हावा गावात पाण्याच्या टाकीसाठी जागा उपलब्ध नाही. अधिकार्‍यांनी योजना बनवताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता जागा ठरवल्याने असे प्रकार घडले आहेत. त्या ठिकाणी जाऊन पाहणी करून जागा ठरवण्याची सूचनाही त्यांनी केली. त्याचप्रमाणे शेडुंगमध्ये गावकर्‍यांनी जय मल्हार सोसायटीला योजनेतून पाणी देण्यास विरोध करणे बरोबर नाही. पनवेल-उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढत आहे. गावात बिल्डिंग झालेली चालते, पण त्यांना पाणी देणार नाही अशी भूमिका घेणे योग्य नाही, असे ते म्हणाले. रायगड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी काम न करणार्‍या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या तसेच काहींना १५ दिवसांची मुदत देऊन काम न सुरू केल्यास त्यांना बदलण्याची सूचना अधिकार्‍यांना दिली.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!