पनवेल दि.६: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर रोजी दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भव्य उद्घाटन होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विमानतळाच्या परिसराची आज पाहणी करून पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेतला.
या पाहणीदरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, विधान परिषद सदस्य विक्रांत पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील तसेच पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे उपस्थित होते.
या वेळी त्यांनी विमानतळ परिसरातील विविध कामांची पाहणी करून सोहळ्याच्या आयोजनासंबंधित सुरक्षा, वाहतूक व्यवस्था तसेच लोकांच्या उपस्थितीच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या तयारीचा सखोल आढावा घेतला. दि. बा. पाटील विमानतळाचे उद्घाटन हा नवी मुंबई व रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी नवा अध्याय ठरणार असून, या सोहळ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.