राष्ट्रीय पुरस्कार विजेती सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर, सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर यांच्यासह अनेक गायकांच्या सुरेल मैफिली
पनवेल दि.१५: सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या ‘दिवाळी संध्या’ या सांस्कृतिक मेजवानीचे दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीतर्फे खारघर, कळंबोली आणि कामोठे परिसरात भव्य आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमधून गायन क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या सुरेल गायनाचा मनमोहक आस्वाद रसिकांना मिळणार आहे.
खारघर भाजपच्यावतीने शनिवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता खारघर मधील गावदेवी मैदानावर तर रविवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०७वाजता रोडपाली बस डेपो सेक्टर १६ कळंबोली येथे होणाऱ्या दिवाळी संध्या कार्यक्रमात राधा हि बावरी फेम सुप्रसिद्ध गायक स्वप्निल बांदोडकर, गायक के. शिरीष, गायिका गुल सक्सेना आणि सपना हेमन या प्रसिद्ध गायकांचे गायन सादरीकरण होणार आहे. तर कामोठे भाजपच्या वतीने बुधवार दिनांक २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालय सेक्टर ६ कामोठे येथील दिवाळी संध्या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेती सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर यांची सुश्राव्य गायनाची सुरेल मैफिल अनुभवायला मिळेल. भाजपतर्फे दरवर्षीप्रमाणे दिवाळी सणाच्या निमित्ताने संगीत, संस्कृती आणि कलेचा संगम साधणारी ही ‘दिवाळी संध्या’ रसिकांसाठी खऱ्या अर्थाने सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे. या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संगीताचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

