अलिबाग, दि.14 : जगभरात सर्वत्र पसरत असलेला नवीन करोना विषाणूचा प्रादूर्भाव व त्याच्या संसर्गाने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य विषयक आंतरराष्ट्रीय आपत्ती जाहीर केलेली आहे. या विषाणूचा प्रादूर्भाव रोखणे व प्रतिबंधित उपाययोजना यासाठी जागतिक आरोग्य संघटना व आरोग्य कुटूंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून दैनंदिन स्वरुपात सूचना देण्यात येत आहेत.
देशात व महाराष्ट्रात सध्या करोना विषाणूचा (कोविड-19) प्रादूर्भाव झाल्यामुळे शासनाने त्याबाबत खबरदारी घेण्याचे सूचित केले आहे. यानुषंगाने जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1987 मधील तरतुदीनुसार प्रभावीपणे कार्यवाही चालू आहे. या पार्श्वभूमीवर करोना विषाणूचा राज्यामधील प्रादूर्भाव रोखण्यासाठी दि.23 मार्च 2020 रोजीच्या अधिसूचनेद्वारे राज्यामध्ये लॉकडाऊन परिस्थिती लागू करण्यात आली आहे.
करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात दि. 17 मे 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून या दरम्यान करोनाबाधित रुग्णसंख्या आटोक्यात ठेवणे,प्रादूर्भाव रोखणे, नागरिकांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी, सोयी-सुविधांसाठी विविध नियम व उपाययोजना पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी रायगड तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड निधी चौधरी यांनी लागू केले आहेत. त्यास पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांची खंबीर साथ मिळत आहे. संपूर्ण प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणा,प्रसारमाध्यम प्रतिनिधी रायगडवासियांना करोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.
महाराष्ट्र राज्यातही करोना बाधित रुग्ण आढळल्याने आजारास प्रतिबंध व नियंत्रण यासाठी तातडीच्या व आपत्कालीन उपाययोजना सुरु करण्यात आलेल्या आहेत. यात रुग्ण शोध मोहीम, रुग्णांचे विलगीकरण व एकंदरच विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण याबाबींचा समावेश आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी कर्तव्य व मार्गदर्शक सूचना कोविड-19 रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरुन जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे, तसेच रायगड जिल्ह्यामध्ये खालील गोष्टींचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे :-
आपल्या हातावर होमक्वॉरंटाईनचा शिक्का मारून घेणे.
आपण आपल्या घरात / जेथे होमक्वॉरंटाईन करुन ठेवलेल्या वास्तूमध्येच राहणे.
आपल्या घरामधील 60 वर्षावरील जेष्ठ व्यक्ती, गरोदर महिला व लहान मुले यांच्यापासून स्वतःला अलग ठेवणे.
आपल्या घरामधील मधुमेह, उच्च रक्तदाब असलेली व्यक्ती किंवा इतर गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तीपासून स्वतःला अलग ठेवणे.
कोविड-19 या रोगाची ताप व खोकला इत्यादी लक्षणे आढळल्यास शासकीय रुग्णालयांमधून तपासणी करून घेणे.
जिल्हा प्रशासनाने विकसित केलेले CQMS ॲप (जिल्हा प्रशासनामार्फत आपल्या मोबाईलवर प्राप्त एसएमएस मधील लिंक व ओटीपीच्या सहाय्याने) स्वतः च्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून त्यातील माहिती भरणे.
ग्राम समिती, शासकीय कर्मचारी,आरोग्य सेवक, पोलिस व महसूल कर्मचारी यांनी आपणास दिलेल्या सूचनांचे पालन करणे,प्रशासनाला सहकार्य करणे.
विशेष सूचना :-
आपणास होमक्वॉरंटाईन केले असल्यामुळे आपणास घराबाहेर अथवा क्वॉरंटाईन केलेल्या वास्तूमधून बाहेर जाण्यास सक्त मनाई आहे. तरी आपण इतरत्र फिरताना आढळल्यास साथरोग प्रतिबंध अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता कलम 188 अन्वये आपल्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करुन फौजदारी कारवाई करण्यात येईल.
मास्कचा वापर करा.
वारंवार हात साबणाने धुवा.
शिंकताना रुमालाचा वापर करा.
घरीच रहा बाहेर, पडू नका.
ताप, खोकला, सर्दी साठी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सर्वांबरोबर सुरक्षित अंतर ठेवा.
हस्तांदोलन करू नका.
ग्रामस्थांसाठी सूचना / आवाहन:- करोना विषाणूच्या संकटसमयी ग्रामस्थांनी सूचनांचे पालन करून ग्राम समिती व प्रशासनाला सहकार्य करावे.
गावामध्ये नव्याने आलेल्या नागरिकांची माहिती त्वरित ग्राम समितीला द्यावी.
गावामध्ये होमक्वॉरंटाईन केलेले नागरिक घरातच राहत आहेत, यावर लक्ष ठेवावे,अन्यथा ग्राम समितीला कळवावे.
कोविड-19 या तापाची रोगाची ताप, खोकला, सर्दी इत्यादी लक्षणे आढळल्यास तात्काळ ग्राम समितीस कळवावे.
स्वयंसेवी संस्था, बचतगट, तरुण मंडळांनी करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.
आपल्या गावातील ग्राम समितीस सहकार्य करावे.
आपल्या मोबाईल फोनमध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करून घ्यावे.
अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, नियंत्रण कक्ष- 02141- 222118, रायगड पोलीस नियंत्रण कक्ष- 02141 – 228473 / 228789 / 220015, जिल्हा शासकीय रुग्णालय- 02141 – 222021 / 7030605408 येथे संपर्क साधावा.
